NGN News
Latest Marathi News

कांद्याला २४०० रुपये भाव न दिल्यास २६ मे रोजी महामार्ग रोखणार

  • आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली लासलगावला एल्गार आंदोलन; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

लासलगाव : राकेश बोरा
राज्यात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून लासलगावमध्ये एल्गार आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

कांद्याला किमान २४०० रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर करून शासनाने थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करावी, अशी मागणी करत येत्या आठ दिवसांत निर्णय न झाल्यास २६ मे रोजी चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर मोठे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी लासलगाव येथे दिला. महाराष्ट्रातील शेतीमाल दिल्लीत जाणार नाही आणि कांदा उत्पादकांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

लासलगाव येथे झालेल्या कांदा आंदोलनात खासदार भास्कर भगरे, खासदार निलेश लंके, लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर, माजी आमदार भुसारा, सोनिया होळकर, तानाजी आंधळे, प्रवीण कदम, माणिकराव शिंदे, दत्तात्रय पाटील, शिवा सुरासे, संदीप दरेकर, छबुराव जाधव, राजेंद्र बोरगुडे, महेश पठाडे, बाळासाहेब दराडे, रमेश पालवे यांच्यासह हजारो शेतकरी सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, आज मला भाषण करायचे नाही, कारण शेतकऱ्यांना पाच ते सहा रुपये किलो दर मिळत आहे. धरणगाव खडक येथील शेतकरी विश्वनाथ उशीर यांनी नैराश्यातून आत्महत्या केली. मात्र शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका करत, सत्ताधारी पक्षाशी संबंधित प्रोड्युसर कंपन्यांना फायदा व्हावा म्हणूनच कांद्याचे भाव पाडले जात आहेत. ज्यांना शेतीचे ज्ञान नाही अशा व्यक्तींना कांदा अभ्यास समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे असा आरोप केला.

मुख्यमंत्री केवळ ट्विट करून प्रश्न सुटत नाहीत. त्यांनी प्रत्यक्ष बाजार समितीत येऊन कांदा उत्पादकांच्या व्यथा जाणून घ्याव्यात, असेही रोहित पवार यांनी म्हटले. तसेच, इराण प्रश्नावर केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे इंधन संकट निर्माण होत आहे. सरकारचा हा नाकर्तेपणा आहे अशी टीकाही त्यांनी केली.

पुढे बोलताना त्यांनी कांद्याला ३ हजार रुपये प्रतिक्विंटल दर देऊन शासनाने थेट खरेदी करावी, तसेच मागील कांदा अनुदानातील उर्वरित १५० रुपये प्रतिक्विंटल रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी केली.

आंदोलनापूर्वी आमदार रोहित पवार, खासदार भगरे, जयदत्त होळकर, उपसभापती संदीप दरेकर, संचालक सोनिया होळकर, सचिव नरेंद्र वाढवणे यांनी लासलगाव बाजार समितीत जाऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

खासदार निलेश लंके यांनी शासनाची धोरणे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत कांदा उत्पादकांच्या मागण्यांसाठी आता रस्त्यावर उतरून ताकद दाखवण्याची वेळ आली आहे असा इशारा दिला. खासदार भास्करराव भगरे यांनी,गेल्या काही वर्षांत शासनाने तब्बल २२ वेळा कांदा निर्यातबंदी केली. जानेवारीपासून मे अखेरपर्यंत विक्री झालेल्या कांद्याला दीड हजार रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्यात यावे अशी मागणी केली.

यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, निफाड पोलिस उप अधीक्षक के. के .पाटील लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या सह मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Comments are closed.