
** एनजीएन न्यूज नेटवर्क
लासलगाव : राकेश बोरा
विंचूर ( त. निफाड ) येथे दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थेमार्फत महिलांना मोफत शिवणकाम व ब्युटी पार्लर प्रशिक्षण, तसेच सरकारच्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन व १५ हजार रुपये रोख मिळवून देण्याचे आमिष दाखवून ६४ महिलांकडून सुमारे अडीच लाख रुपये उकळल्याप्रकरणी तिघांविरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हनुमाननगर, विंचूर येथील सौ. मनिषा प्रमोद कडलग (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित संजय अभिमान बोराळे (वय ४२), जयश्री संजय बोराळे (वय ३५, दोघे रा. सोहम सिटी, लासलगाव, मूळ रा. नांदगाव साखोरा) तसेच विशाल कान्हू गरूड (वय ३३, रा. कोटमगाव, ता. निफाड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, संशयितांनी हनुमाननगर येथील ३० महिलांचा बचत गट तयार करून काही महिलांना टेलरमार्फत प्रशिक्षणही दिले. तसेच १५ हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले. त्यानंतर संस्थेचे सदस्य विशाल गरूड हे गावात येऊन पैसे घेऊन जातील, असे सांगण्यात आले. त्यानुसार फिर्यादी मनिषा कडलग यांनी विशाल गरूड याला फोन-पे अॅपद्वारे २० हजार रुपये दिले. तसेच ६४ महिलांनी प्रत्येकी ३ हजार ५०० ते १० हजार रुपयांपर्यंत रक्कम ऑनलाइन दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
संशयितांनी महिलांकडून एकूण अंदाजे २ लाख ५० हजार रुपये स्वीकारून संस्थेच्या नावाने पावत्या दिल्या. मात्र, ठरल्याप्रमाणे कोणतीही वस्तू न देता वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच निफाड, सिन्नर, येवला व इतर तालुक्यांतील अनेक महिलांकडूनही अशाच प्रकारे पैसे गोळा केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१६(२), ३१८(४) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments are closed.