
- जगदंबा पतसंस्थेत खरातच्या 32 खात्यांना सहमती दर्शवणे अंगलट
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात आणखी एक बडा मासा पोलिसांच्या रडारवर आला आहे. सिन्नर पोलिसांनी या प्रकरणात शिवनिका संस्थानचे माजी सचिव तथा जगदंबा माता पतसंस्था संचालक नामकर्ण आवारे यास अटक केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही अटक झाल्याची माहिती पुढे आली आहे. गुरुवारी सकाळी आवारे यास कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, सिन्नरच्या जगदंबा माता पतसंस्थेत खरातने उघडलेल्या 32 खात्यांना आवारे याची सहमती असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई वेगाने करण्यात आली. खरातच्या कबुलीनंतर सिन्नर पोलिसांनी नामकर्ण आवारेला अटक करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. आवारे सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचा चेअरमन आणि जगदंबा माता पतसंस्था कुंदेवाडीचा संस्थापक आहे. आपल्या ‘असा मी नामकर्ण’ या पुस्तकात आवारे याने अशोक खरातची स्तुती करणारे प्रकरण लिहिल्याने तो आधीच चर्चेत आला होता. त्यानंतर आता अटकेची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, अशोक खरातला आज सिन्नर येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खरातला सिन्नर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते. जगदंबा पतसंस्थेतील बनावट खाती आणि आर्थिक व्यवहारप्रकरणी अशोक खरातवर गुन्हा दाखल आहे.
Comments are closed.