
- बाळासाहेब पाटील यांची मुंबईत पोलिस उपायुक्तपदी बदली
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची मुंबई येथे पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी डॉ. स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे . गेल्या वर्षभराच्या कार्यकाळात बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याने त्यांची कारकीर्द जिल्हावासीयांच्या स्मरणात राहील.
गृह विभागाने गुरुवारी पोलीस सेवेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या फेरबदलात ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. स्वामी यांची नाशिक ग्रामीणच्या नवनियुक्त पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. स्वामी यांनी याआधी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून दखलपात्र कामगिरीची नोंद केली आहे. विशेषतः, राजकीय पाठबळ असलेल्या सराईत गुन्हेगारांना त्यांनी सळो की पळो करून सोडले होते. नाशिक ग्रामीणमध्ये ते नेमके काय बदल करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
मालेगावची सूत्रे सूरज गुंजाळ यांच्याकडे
मालेगावचे अपर अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांची पदोन्नतीने जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली असून संधू यांच्या जागी आता सूरज गुंजाळ हे मालेगावचे नवे अपर पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील.
Comments are closed.