NGN News
Latest Marathi News

नाशिक महानगरपालिका शाळा विद्यार्थ्यांची भरारी, IISER दरबारी..

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यामंदिर नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 18 आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून, विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून शिकण्याच्या सुवर्णसंधी नेहमीच उपलब्ध करून देत असते.

इस्रो अभ्यास दौरा सहलीनंतर आता मनपा शाळा क्रमांक १८, आनंदवली येथील तब्बल चाळीस विद्यार्थी दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी आयसर सेंटर, पुणे (Indian Institute of Science Education and Research) येथे ज्ञानयात्रा करून आले.

या भेटीदरम्यान विद्यार्थी ‘हँड्स-ऑन’ पद्धतीने विविध वैज्ञानिक प्रयोग स्वतः करून पाहिले. प्रयोगशाळेतील सजीव वातावरणात शास्त्रज्ञ व तज्ञांशी थेट संवाद साधत आपल्या शंकांचे निरसन करण्याची अमूल्य संधी त्यांना लाभली. विज्ञान क्षेत्रातील आजवर लागलेले महत्त्वपूर्ण शोध, त्यांच्या मागील संकल्पना आणि त्यांचे वास्तव जीवनातील उपयोग यांचा अभ्यासही विद्यार्थ्यांनी येथे प्रत्यक्ष अनुभवातून केला. याशिवाय, पिंपरी-चिंचवड येथील विज्ञान पार्क ला भेट देऊन त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा अधिक विस्तृत झाल्या. विज्ञानाच्या विश्वात नव्या शक्यता शोधण्याची प्रेरणा या दौऱ्यातून विद्यार्थ्यांना मिळाली.

ही संपूर्ण अभ्यासदौरा सहल लोकसहभागातून साकारली गेली, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. आनंदवली प्रभागाचे नगरसेवक तथा उपमहापौर विलास शिंदे तसेच नगरसेविका उषाताई बेंडकोळी यांनी मोठी आर्थिक मदत देत या उपक्रमाला बळ दिले आहे. नाशिक महानगरपालिका प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी विद्यार्थ्यांची व शिक्षकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांना अभ्यास दौऱ्यात मुख्याध्यापिका अनिता जाधव, शिक्षिका कुंदा बच्छाव, वैशाली भामरे, ममता सुंठवाल, अमित शिंदे, कैलास गायकवाड यांनी समवेत जाऊन मार्गदर्शन केले.

Comments are closed.