
- 2026-27 हंगामासाठी ही प्रक्रिया; तीव्र वाढ रोखण्यासाठी पाऊल
** एनजीएन न्यूज नेटवर्क
लासलगाव : राकेश बोरा
केंद्र सरकारने कांद्याच्या दरातील चढ-उतार नियंत्रणात ठेवण्यासाठी यंदा नेहमीपेक्षा लवकर खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिलपासूनच बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी केली जाणार असून 2026-27 हंगामासाठी ही प्रक्रिया आगाऊ राबवली जात आहे. रब्बी हंगामातील आवक वाढीच्या काळात योग्य वेळी बाजारात हस्तक्षेप करता यावा आणि पुढील काळात दरात होणारी तीव्र वाढ रोखता यावी, हा या निर्णयामागील उद्देश आहे.
किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत यंदा 2 लाख टन कांदा खरेदीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. आवश्यक वस्तूंच्या उपलब्धता व दरांचा आढावा घेणाऱ्या मंत्रिगटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ग्राहक व्यवहार विभागाने दिली आहे.
ही खरेदी प्रक्रिया NAFED आणि NCCF या संस्थांमार्फत राबवली जाणार असून दोन्ही संस्थांना प्रत्येकी 1 लाख टन कांदा खरेदीची जबाबदारी देण्यात आली आहे. रब्बी हंगामातील सध्याच्या उत्पादनातून थेट खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यासाठी तत्काळ तयारी सुरू करण्यात आली आहे.
सरकारकडील बफर स्टॉक कांद्याच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. विशेषतः सप्टेंबर ते नोव्हेंबर या कमी पुरवठ्याच्या कालावधीत बाजारात साठा सोडून दरवाढ आटोक्यात ठेवली जाते. यामुळे किरकोळ महागाईवरही थेट परिणाम होतो.
गेल्या काही वर्षांत खरेदी धोरण अधिक लवचिक ठेवण्यात आले आहे. 2024-25 मध्ये सरकारने 4.7 लाख टन कांदा खरेदी करून सप्टेंबरपासून बाजारात साठा सोडण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर पुढील वर्षी पुरवठा तुलनेने स्थिर असल्याने खरेदी 3 लाख टनांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली. मात्र, मागील वर्षी काही अडचणींमुळे खरेदी जुलैमध्ये उशिरा सुरू झाली होती, त्यामुळे यंदा आगाऊ तयारीवर भर देण्यात आला आहे.
Comments are closed.