
- शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान; समाजकंटकांच्या कृत्याने संतापाची लाट
** पुष्कर भन्साळी
निफाड : एनजीएन न्यूज नेटवर्क
आधीच अवकाळी पाऊस, गारपीट आणि नैसर्गिक आपत्तींच्या फटक्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर आता मानवनिर्मित संकटाचे सावट कोसळल्याची संतापजनक घटना सावरगाव शिवारात उघडकीस आली आहे. मेहनतीने उभी केलेली द्राक्षबाग काही समाजकंटकांनी एका रात्रीत उद्ध्वस्त केल्याने शेतकरी अक्षरशः कोलमडून पडला आहे.
शेतकरी शंकर साहेबराव कुशारे यांनी वर्षानुवर्षांच्या कष्टातून फुलवलेली द्राक्षबाग अज्ञातांनी रात्रीच्या अंधारात लक्ष्य केली. सुमारे 800 ते 900 द्राक्षाची झाडे धारदार हत्याराने तोडून टाकत बागेचा अक्षरशः विध्वंस करण्यात आला. काही तासांत उभी बाग जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
इतकेच नव्हे, तर या इसमांनी दोन बोअरवेलची वायर व पाईप कापून पाण्याची मोटारही चोरी केली, तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मुद्दाम उद्ध्वस्त केली. त्यामुळे शेतीबरोबरच दैनंदिन जगणेसुद्धा संकटात सापडले आहे.
आधीच अस्मानी संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी आता या मानवनिर्मित घावामुळे पूर्णपणे हवालदिल झाला आहे. “नैसर्गिक आपत्तींनी उध्वस्त केलेल्या शेतीवर आता माणसांच्याच हातून घाला घातला जात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे. या दुहेरी संकटामुळे शेतकरी वर्गात तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी शंकर कुशारे यांनी केली आहे. अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
Comments are closed.