NGN News
Latest Marathi News

दुसऱ्या गुन्ह्यात अशोक खरातला ७ दिवसांची पोलीस कोठडी

  • सुरक्षा कारणास्तव व्हीडीओ कॉनफरन्सद्वारे उपस्थिती

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील दुसऱ्या गुन्ह्यात गुरुवारी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या सुनावणीसाठी खरात याला व्हीडीओ कॉनफरन्सद्वारे उपस्थित करण्यात आले. सुरक्षेच्या कारणामुळे एसआयटीकडून खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याचा अर्ज केला होता. एसआयटीचा हा अर्ज न्यायालयाने मान्य केला.

 खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याची एसआयटीला परवानगी दिली. यावेळी कोर्टरुममध्ये 4 स्क्रीन लावण्यात आल्या. न्या. बी इन ईचपुरानी यांच्या कोर्टात आज अशोक खरातप्रकरणी ऑनलाईन सुनावणी झाली. अशोक खरात प्रकरणाचे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. ऑनलाईन सुनावणीत खरातला न्यायाधीशांनी नाव विचारले. यावेळी आवाज कमी आल्यामुळे न्यायाधीशांनी अशोक खरातला मोठ्याने बोलण्यास सांगितले. पुढे सुनावणीत इथे बाजू मांडत आहे ते भाटेच तुमचे वकील आहेत का, असे न्यायाधीशांनी विचारले. यावर हो असे उत्तर अशोक खरातने दिले. त्यानंतर सुनावणीच्या शेवटी सगळ्यांचा युक्तिवाद झाल्यानंतर तुला काही बोलायचे आहे का, असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला. यावर हात जोडून काही नाही, असे अशोक खरात म्हणाला.

कोर्ट रूममध्ये लावलेल्या चार मोठ्या स्क्रीनवर अशोक खरात अवतरला. गुलाबी रंगाचा टी-शर्ट, वाढलेली दाढी तसेच दोन्ही हात एकमेकांवर धरून निपचित उभा असलेला खरात यावेळी पाहायला मिळाला.

खरातच्या वकिलाचा कोठडीला विरोध

खरातच्या वकिलांनी 7 दिवसांच्या वाढीव कोठडीला जोरदार विरोध केला. हा दुसरा गुन्हा आहे. एक प्रकारचा गुन्हा आहे. याआधी 14 दिवस पोलीस कोठडी झाली आहे. माझ्याकडे अद्याप या प्रकरणाची फिर्याद आली नाही. ही 2022 ची घटना आहे. याआधी 14 दिवस पोलीस कोठडी दिली आहे. आता पुन्हा 7 दिवस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. सरकारी पक्षाने खरात हा ‘मास्टरमाईंड’ असून तो तपासात सहकार्य करत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

Comments are closed.