
- एचआयव्ही चाचणी निगेटिव्ह; म्हणाला, ज्यांचे भले केले तेच माझ्यावर उलटले
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, ज्यांचे भले केले तेच माझ्यावर उलटले, असे सांगताना भोंदूबाबा अशोक खरात याने महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग असल्याचा खळबळजनक दावा चौकशी दरम्यान केला आहे. मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही, असेही त्याने एसआयटीला सांगितले. दरम्यान, अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या खरातची एचआयव्ही चाचणी निगेटिव्ह आली आहे.
अशोक खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरु असून त्यामध्ये विविध धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आपल्या कृतीचे समर्थन करताना त्याने महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग असल्याचा दावा केला आहे. महिला स्वतःहून प्रश्न घेवून येत आणि विधीसाठी तयारी दर्शवित होत्या, असे सांगताना आपण कोणाला बळजबरी करीत असल्याच्या खरात याने सपशेल इन्कार केला. चौकशी दरम्यान खरातचा मोबाईल तपास पथकाने ताब्यात घेत मोबाईलमधील डेटा रिकव्हर करत महत्वाचे पुरावे पथकाला मिळणार असल्याची माहिती आहे. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने खरात याने दीडशे हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे, नाशिक पोलिसांत दाखल झालेल्या एकूण आठपैकी सात गुन्हे महिला अत्याचार संदर्भात आहेत. अशोक खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याने पिडित महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे खरातची एचआयव्ही चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे.
ओकस कार्यालय सील; मालमत्तांचा शोध सुरू
एसआयटी पथकाने खरातच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस कार्यालयात तपासणी केली. याच कार्यालयात अनेक महिलांचे लैंगिक शोषण करत होता. या कार्यालयात तपासणी दरम्यान अनेक कागदपत्रे आढळून आलीत. तपासणी केल्यानंतर अशोक खरातचं ओकस कार्यालय एसआयटीकडून सील करण्यात आले. तपास पथकाकडून मालमत्तेची माहिती मागवली असून अशोक खरातच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी सुरु आहे. शिवाय, राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, याचा तपास केला जाणार आहे.
Comments are closed.