NGN News
Latest Marathi News

बदनामीकारक मजकूर, फोटो, व्हिडिओ शेअर कराल तर खबरदार !

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : बहुचर्चित अशोक खरात प्रकरणानंतर सोशल मीडियावर पीडित महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. पीडित महिलांची बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

अनेक फोटो सोशल मीडियावर मॉर्फ करून तसेच AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनावट स्वरूपात व्हायरल केले जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक सायबर पोलिसांनी अशा सर्व आक्षेपार्ह पोस्ट्सवर बारकाईने लक्ष ठेवले असून, संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, पीडित महिलांसोबत इतर संबंधित महिलांचेही फोटो चुकीच्या पद्धतीने वापरले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे निरपराध महिलांचीही बदनामी होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. कोणत्याही प्रकारे बदनामीकारक मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर थेट गुन्हा नोंदवला जाणार आहे. दरम्यान, पीडित आणि तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा, चुकीची माहिती आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्सवरही लक्ष ठेवण्यात येत आहे, जेणेकरून प्रकरणाची संवेदनशीलता कायम राहील. 

Comments are closed.