NGN News
Latest Marathi News

विवाहितेची दोन लाख रुपयांत विक्री; जबरदस्तीने विवाह लावला

  • ‘इव्हेंट मॅनेजमेंट’द्वारा नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक; दोन महिला ताब्यात

** एनजीएन न्यूज नेटवर्क

सातपूर : ‘इव्हेंट मॅनेजमेंट’द्वारा नोकरी देण्याच्या बहाण्याने विवाहितेची दोन लाख रुपयांत विक्री करण्यात आल्याची धक्कादायक घटना सातपूर पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आली आहे. संबंधित विवाहिता एकल असून एका बाळाची आई आहे. विक्रीनंतर तिचा नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे जबरदस्तीने विवाह लावण्यात आल्याची बाबही उघड झाली आहे. या प्रकाराने जिल्हाभर खळबळ उडाली आहे. यासंदर्भात दोन महिलांना ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार, सातपूर औद्योगिक वसाहतीतील कार्बन नाका परिसरात राहणाऱ्या पीडित महिलेला दोन अनोळखी महिलांनी संपर्क करीत ‘इव्हेंट मॅनेजमेंट’द्वारा नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला मोटारीने मालेगावमार्गे नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे नेण्यात आले. तिथे नवनाथ खिरडकर नावाच्या तरुणाकडून दोन लाख रुपये घेत पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिचा जबरदस्तीने विवाह लावण्यात आला. पीडितेने दुसऱ्या दिवशी ( दि. २८ फेब्रुवारी ) रोजी मोबाईलवरून स्वतःच्या आईशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार कथन केला. पीडितेच्या माता-पित्यांनी सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर एक पोलीस पथक तत्काळ जातेगाव येथे रवाना झाले. पोलिसांनी धाडसी कारवाई करत पीडितेची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात दोन महिलांना अटक करण्यात आली असून सहा संशयित फरार व्यक्तींचा शोध सुरु आहे. या प्रकरणाच्या धाग्यातून एखादे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Comments are closed.