- देवस्थान ट्रस्ट ; गर्भगृह आणि देणगी दर्शन व्यवस्थाही राहणार बंद
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महाशिवरात्रीनिमित्त श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ४१ तास भाविकांसाठी खुले राहणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. त्यानुसार रविवारी पहाटे चार वाजेपासून सोमवारी रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. या सुविधेमुळे व्हिआयपी दर्शनासह गर्भगृह आणि देणगी दर्शन व्यवस्था या काळापुरती बंद ठेवण्यात येणार आहे.
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची अलोट गर्दी असते. देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असल्याने लांब रांगा लागतात. ही बाब लक्षात घेवून देवस्थान ट्रस्टने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून मंदिर ४१ तास खुले ठेवण्यात येणार आहे. शनिवार ते सोमवार दरम्यान मंदिर उघडल्यापासून सकाळी साडेदहापर्यंत स्थानिक भाविकांना मंदिराच्या पश्चिम दरवाजातून प्रवेश करून दर्शन घेता येईल. याकाळात स्थानिकांना नातलग किंवा अतिथी यांना सोबत आणता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दुपारी ३ वाजता पालखी
दरम्यान, महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी ३ वाजता श्री त्र्यंबकराजाची पालखी निघणार आहे. पालखी मार्गावर शिव तांडव ग्रुपच्यावतीने मुख्य दोन चौकात अघोर नृत्य सदर करण्यात येणार आहे. पाच वाजेपर्यंत पालखी देवस्थानात परतेल. रात्री महापूजा करण्यात येईल. याव्यतिरिक्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये जेष्ठ गायक सुधीर फडके यांचे ‘गीतरामायण’ तसेच कथक नृत्यसेवा यांचा समावेश राहील. परिवहन महामंडळाने महाशिवरात्रीनिमित्त विशेष बससेवा वेळापत्रक जाहीर केले आहे.
Comments are closed.