- मराठी ऐवजी हिंदीची सक्ती केल्याचा आरोप
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
विद्यार्थ्यांना मराठीत शिकवणार नाही, शिकायचे असेल तर हिंदीतच शिका, अशी अरेरावी केल्याचा आरोप करीत खाजगी कोचिंग क्लासमधील कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, नाशिकच्या शरणपूर रोडवरील फिजिक्सवाला कोचिंग क्लासमध्ये हा प्रकार घडला. या क्लासमध्ये बहुसंख्य विद्यार्थी मराठी भाषिक असून त्यांची मातृभाषा मराठी आहे. तथापि, क्लासमधील बहुतांश शिक्षक हे परप्रांतीय असून त्यांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही विद्यार्थ्यांना हिंदी समजण्यात अडचणी येत असल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये वारंवार वाद होत असल्याची तक्रार मनविसेकडून करण्यात आली. क्लासमधील एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना मराठीत शिकवणार नाही, शिकायचे असेल तर हिंदीतच शिका, अशी अरेरावी केली. यासोबतच मराठी भाषेला गावठी म्हणून हिणवल्याचा आरोपही मनसे पदाधिकाऱ्यानी केला. मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष ललित वाघ, प्रदेश कार्यकारिणी सदस्य उमेश भोई, बाजीराव मते, उपजिल्हाध्यक्ष नितीन धाना, शहर संघटक अक्षय कोंबडे, विभाग अध्यक्ष रोहित उगावकर यांनी क्लास व्यवस्थापनाला जाब विचारत शिक्षकांची यादी मागितली. विद्यार्थ्यांवर दादागिरी करणे, धमक्या देणे, मराठीत बोलण्यास मज्जाव करणे, या मुद्द्यांवरून व्यवस्थापनाला धारेवर धरण्यात आले. याच वादात मराठी बोलण्यास विरोध करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप व्यवस्थापनाने केला.
त्यानंतर मराठी शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा क्लासची तोडफोड करून पुन्हा ‘मनसे स्टाईल’ आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही मनसे कार्यकर्त्यांनी दिला. या प्रकरणी क्लासच्या मॅनेजरने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Comments are closed.