NGN News
Latest Marathi News

भारतीय संस्कृतीचे आचरण करणे काळाची गरज : शांतिगिरीजी महाराज 

  • तुळजाभवानी माता व दक्षिणाभिमुख हनुमान मंदिराचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात

** अमर आढाव

ओझर : एनजीएन न्यूज नेटवर्क

भारतीय संस्कृतीचे आचरण करणे  काळाची गरज आहे, मंदिरे ही संस्कारांची केंद्र आहेत. या संस्कार केंद्रांचे जतन व्हायला हवे. या संस्कार केंद्रामार्फत आपापसातील सर्व भेद विसरून सर्व हिंदूंनी एकत्रित येऊन आपल्या संस्कृतीचे संवर्धन करावे, असे प्रतिपादन निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केले.             

  येथील छत्रपती शिवाजी नगर,संजीवनी नगर परिसरातील जागृत देवस्थान  राजराजेश्वरी श्री तुळजाभवानी  माता व  दक्षिणाभिमुख महारूद्र हनुमान मंदिराच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सत्संगादरम्यान ते बोलत होते.

     यावेळी बोलताना जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराजांनी जातीनिर्मुलन, व्यसनमुक्ती, संस्कृतीचे जतन, महिलांचा लहान मुलांच्या जडणघडणीतील सहभाग आदी विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.आजचे बालक उद्याचे राष्ट्र चालक आहे.त्यामुळे आपल्या मुलांवर बालवयातच योग्य संस्कार करा,विषमुक्त सेंद्रिय शेती करा यांसह विविध विषयांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. प्रसंगी स्वामी परमेश्वरगिरीजी महाराज, हृदयानंद माऊली, वेदशास्त्र संपन्न पंडित धनंजयगुरु जोशी,पंडित महेशगुरु शिवपुरी यांची उपस्थिती यावेळी होती.याप्रसंगी जय बाबाजी परिवाराच्या कार्याची माहिती आकाश दळवी यांनी दिली.

मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (दि. ३१ ) पहाटे ५ वाजता तुळजाभवानी देवी आणि दक्षिणाभिमुख महारुद्र  हनुमानाच्या श्री मूर्तींचा महाअभिषेक संपन्न झाला.  पहाटेच्या अल्हाददायक वातावरणात अभिषेक प्रसंगी वेद मंत्रोच्चाराने संपूर्ण मंदिर परिसरात चैतन्य निर्माण झाले. सकाळी ११ वाजता महिला साधिकांनी दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन केले. दुपारी २ वाजता जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या पवित्र पालखीची ढोल ताश्याच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. अबालवृद्धांनी मिरवणुकीत सहभागी झाले. मिरवणुकी प्रसंगी जय तुळजा भवानी,जय हनुमान, जय श्रीराम,जय बाबाजी आदी घोषणांनी मिरवणुक मार्ग दुमदुमून गेला होता. यानंतर जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच पुष्पवृष्टी  व फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.मंदिर सेवकांच्या वतीने जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे भव्य पुष्पहार,पगडी,महावस्त्र देऊन पूजन करण्यात आले.यावेळी ब्रह्मवृद्धांच्या पवित्र मंत्रघोषाने परिसर अधिकच पावन झाला.

गायक राहुल शिंदे यांनी आपल्या सुमधुर आवाजात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबला वादक शंकर दाभाडे यांनी साथ दिली. भक्तिगीतांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. महाआरतीने सत्संगाचा समारोप झाला.कार्यक्रम यशस्वितेसाठी राजराजेश्वरी तुळजाभवानी माता व दक्षिणाभिमुख महारुद्र हनुमान मंदिर सेवा समितीने विशेष परिश्रम घेतले.

Comments are closed.