- प्रभाग क्रमांक 11 मधील घटना; संशयित तरुण लोंढे गटाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर प्रचारादरम्यान थेट बंदूक रोखून धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना प्रभाग क्रमांक 11 मध्ये घडली आहे. घटनेनंतर नागरिक आणि कार्यकर्त्यांनी तत्काळ बंदूक ताणणाऱ्या तरुणाला पकडून चोप देत नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, याप्रकरणातील संशयित रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा कार्यकर्ता असल्याचा दावा ‘आप’कडून करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, समाधान आहेर हे कार्यकर्त्यांसह प्रचारासाठी फिरत असताना एका तरुणाने अचानक त्यांच्यासमोर बंदूक काढून ‘प्रचाराला फिरायचे नाही’ अशी धमकी दिली. या प्रकारामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी बंदूक ताणणाऱ्या तरुणाला पकडले. यावेळी तरुणाला चोपही देण्यात आला. त्यानंतर सातपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेचा व्हिडिओ ‘आप’ च्या कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये बंदूक दाखवून धमकावल्याचा प्रकार दिसत असल्याचा दावा ‘आप’कडून करण्यात आला आहे. संशयित रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा कार्यकर्ता असल्याचा दावाही पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे,
Comments are closed.