NGN News
Latest Marathi News

सटाण्याजवळ अज्ञात वाहन धडकेत मोटरसायकलवरील दाम्पत्य ठार

** श्रीकांत रौंदळ

सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क

साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटर सायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले आहेत. संदीप गावित(३५) आणि आशाबाई संदीप गावित (३२) रा. अमली पाडा विसरवाडी ता. नवापूर अशी अपघातात मयत झालेल्यांची नावे आहेत.

अमली पाडा येथील पती -पत्नी मोटरसायकलने सटाणा येथून ताहराबादकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात संदीप गावित व त्याची पत्नी अशा गावीत हे जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की मृतदेह अक्षरशः छिन्नविछिन्न झाले होते .अपघातानंतर अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेचे वृत्त समजताच सटाणा पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई निंबा खैरनार व गणेश गरुड घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने एका खाजगी रुग्णवाहिकेतून मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले. सटाणा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.