- ठेंगोडा येथील इरफान इस्माईल पिंजारी जागीच ठार;दोघे जखमी
** पंडित पाठक
लोहोणेर एनजीएन न्यूज नेटवर्क :
शिर्डी साक्री जी ७५२ या राष्ट्रीय महामार्गावरील ठेंगोडा-सटाणा रस्त्यावरील तुर्की हुडी परिसरात सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार झाला असून इतर दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना मालेगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
याबाबत घडलेली घटना अशी की. ठेंगोडा सटाणा रस्त्यावर ट्रॅक्टर व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर अपघात झाला त्यात ठेंगोडा येथील इरफान इस्माईल पिंजारी हा जागीच ठार झाला तर त्यापैकी एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. वेळेवर मदत मिळाल्यामुळे उर्वरित दोघांचे प्राण वाचविण्यात यश आले. ठेंगोडा येथील वैशाली पाटील, हर्षल कोठावदे आणि हरी भास्कर यांनी प्रसंगावधान राखून मदत केल्याबद्दल नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
या मार्गावर यापूर्वीही वारंवार अपघात घडले असून अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. घरातील कर्त्या पुरुषाचा अपघाती मृत्यू झाल्यास संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ येते, अशी भावना संतप्त नागरिक व्यक्त करीत आहेत. मात्र,या रस्त्याच्या कामा बाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने संताप वाढत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी सुरू असलेले रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असून दिशादर्शक फलक, सूचना फलक व सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे समोरासमोर वाहने आल्याने अपघात घडला. अयोग्य नियोजन आणि प्रशासनाची निष्काळजीपणा यालाच या अपघातास जबाबदार धरले जात आहे. या घटनेनंतर मोरेनगर येथील माजी उपसरपंच व व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी शासन व प्रशासनावर तीव्र टीका करत तातडीने योग्य दिशादर्शक फलक, गतीरोधक व सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा परिसरातील शेतकरी व नागरिक जनआंदोलन उभारतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Comments are closed.