नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
आर्थिक वादातून त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार यांची धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याप्रकरणी आरोपी समीर भालचंद्र गोंदके ( १९) याला नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आजन्म कारावासासह दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने त्यावेळी अवघा जिल्हा हादरला होता. सदर घटना २१ ऑक्टोबर २०२० रोजी घडली होती.
त्र्यंबकेश्वर शहरातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित अशा तुंगार घराण्यातील धनंजय तुंगार यांची आरोपी समीर याने आर्थिक वादातून निघृण हत्या केली होती. समीर याने तुंगार यांच्याशी आधी वाद घातला आणि त्यानंतर त्यांच्या मानेत चाकू खुपसला आणि घटना स्थळावरून पलायन केले. या घटनेत धनंजय यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल होता. तपास तत्कालीन उपविभागीय अधिकारी भीमाशंकर ढोले यांनी करुन दोषारोप पत्र दाखल केले होते.
खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायधीशांसमोर झाली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी २० साक्षीदार तपासले. चार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. यातील एक साक्षीदार फितूर झाला. सीसीटीव्ही फूटेज, वैद्यकीय अहवाल, डीएनए या आधारे आरोपी समीरविरोधात आरोप सिद्ध झाल्याने त्यास जन्मठेपेची शिक्षा व दहा हजारांचा दंड ठोठावला.
Comments are closed.