NGN News
Latest Marathi News

महापालिका निवडणुक पार्श्वभूमीवर १२५ सराईत गुन्हेगार हद्दपार

  • पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांची माहिती

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

आगामी महापालिका निवडणुकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहर पोलिसांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून १२५ सराईत गुन्हेगारांच्या विरोधात हद्दपारीची करावी करण्यात आली आहे. साधारणपणे १५ दिवसांसाठी हद्दपारी लागू राहील, अशी माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली.

महापालिका निवडणूक निष्कंटकपणे पार पडावी, यासाठी यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करताना कोणतीही बाधा निर्माण होऊ नये, हा त्यामागील उद्देश आहे. नाशिक शहरातील पंचवटी, आडगाव, भद्रकाली, म्हसरूळ, सरकारवाडा, गंगापूर रोड, मुंबई नाका आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

नायलॉन मांजा वापरणारे रडारवर..

आगामी संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर काही पतंगप्रेमी नायलॉन मांजा वापरतात. बंदी असतानाही नियमाचे उल्लंघन करीत ही कृती केली जाते. पोलीस खाते याबाबत गंभीर असून नायलॉन मांजा वापरणारे रडारवर असल्याचे राऊत यांनी सांगितले. यासंदर्भात आतापर्यंत ७३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पुढेही कारवाई सत्र सुरु ठेवण्यात येणार आहे.

Comments are closed.