** एनजीएन न्यूज नेटवर्क
सिरीयल किलर (Serial Killer) ही संकल्पना जितकी भयंकर आहे, तितकीच ती मानवी मानसिकतेच्या दृष्टीने गुंतागुंतीची आहे. सिरीयल किलर म्हणजे अशी व्यक्ती जी ठराविक कालावधीच्या अंतराने (Cooling-off period) तीन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांची हत्या करते. गुन्हेगारी मानसिकता आणि गुन्हेगारांचे मानस शास्त्र या विषयाचा सखोल आढावा घेताना आपल्याला हे समजणे पण गरजेचे आहे की ज्या सर्वसामान्य समाजात आपण दररोज राहतो, वावरतो त्यात इतर कोणत्या विचित्र, विक्षिप्त मानसिकतेचे लोकं पण आपल्या आजूबाजूला वावरत असतात? आजकालचे एकंदरीत सामाजिक वातावरण पाहिले असता खुनासारखे गुन्हे अत्यंत किरकोळ करणातून घडताना दिसतात. एखाद्या व्यक्ती प्रती असलेला टोकाचा राग, त्याने घडवलेली आपल्या मनाविरुद्ध ची घटना अथवा कृती, बदला, सुड, आर्थिक व्यवहार, नातेसंबंध, स्वसंरक्षण या सारखी कारणे खुणाच्या घटनानमागे पाहायला मिळतात. अनेकदा कोणतेही पूर्वनियोजन वगैरे काहीही नसताना ओढवलेली परिस्थिती, मर्यादेपलीकडे गेलेले वाद, अनपेक्षित आघात या वर आधारित खुनासारख्या घटना घडल्याचे आपण पाहतो.
आजच्या लेखामार्फत आपण सिरीयल किलरची सायकॉलॉजी (मानसशास्त्र) जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला सातत्याने नवनवीन लोकं भेटतात आपण कोणालाच वरवर पाहून ओळखू शकत नसतो की त्याच्या मनाचा तळ किती खोल आहे? एखादयाची डार्क सिक्रेट्स काय आहेत? त्याच्या वागण्या बोलण्यातील लक्षण काय सांगतात? आपण कोणापासून कधी कसे सावध राहणे आवश्यक आहे? हे सुद्धा आपल्याला अनेकदा माहिती नसते की आपल्याबद्दल कोणाच्या मनात कशाबद्दल चा, कोणता आणि कोणत्या काळातला द्वेष भरलेला आहे? कोण आपल्यावर अप्रत्यक्ष लक्ष ठेवून आहे, कोणाच्या मनात कट्टर बदल्याची भावना दबा धरून बसली आहे? आपण सगळेच जगताना वावरतांना खूप कमी असा विचार करतो की आपल्याला, आपल्या कुटुंबाला, आपल्या जीवाला कोणापासून धोका आहे का? अनेकदा आपल्यामुळे कोणाचं वाईट झालेलं असत, अप्रत्यक्ष रित्या कोणी खूप दुखावलेलं असत, कोणाचं आयुष्य कुटुंब आपल्यामुळे दिशाहीन झालेला असत, आपल्या मुळे कोणावर अन्याय झालेला असतो पण आपण मात्र ते सपशेल विसरलेलो असतो. आपलं नॉर्मल रुटीन सुरु असत पण ज्यांचं आयुष्य आपल्या मुळे बिघडलं आहे त्यांच्या मनात, डोक्यात वादळं सुरु असते.
सिरीयल किलर हे सामान्य गुन्हेगारांपेक्षा वेगळे असतात. त्यांच्या मनात हत्येमागे विशिष्ट ‘पॅटर्न’ किंवा ‘फँटसी’ असते.
नियंत्रण आणि सत्ता प्राप्त करणे या लोकांचा उद्देश असतो. बहुतांश किलरना दुसऱ्याच्या आयुष्यावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात आनंद मिळतो. त्यांना पीडित व्यक्तीला असहाय्य बघायला आवडते. आपल्यासमोर कोणी जीवाची भीक मागतोय, माफी मागतोय,लाचार होतोय हे पाहून अश्या लोकांना आसुरी आनंद मिळत असतो.
सिरीयल किलर मध्ये सहानुभूतीचा अभाव असतो. कोणामुळे आपल्याला त्रास झाला असेल तर ते विसरून जावे, त्याला माफ करावे, त्याने चूक केली आपण पण चुकू नये असे विचार त्यांच्यात नसतात. सूड आणि बदल्याच्या भावनेने पेटलेले असल्यामुळे त्यांच्यात त्यांच्यातील सहानुभूती पूर्ण संपलेली असते. या लोकांमध्ये ‘एम्पथी’ (दुसऱ्याचे दुःख समजून घेण्याची क्षमता) नसते. त्यांना कोणाला त्रास देताना पश्चात्ताप होत नाही उलट दुसऱ्याला त्रास होत असताना असे लोकं त्याची मज्जा घेतात.
अँटी-सोशल पर्सनालिटी डिसऑर्डर म्हणजेच अनेकदा हे लोक ‘सायकोपॅथ’ किंवा ‘सोशिओपॅथ’ असतात. ते वरवर अत्यंत मोहक आणि सामान्य दिसू शकतात, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. आपल्या मधेच राहणारे, इतर वेळी सर्वसामान्य आयुष्य जगणारे, सर्व रुटीन नित्यनियमित सुरु असणारे वरून खूप प्रेमळ, गोड बोलणारे, सहकार्य अथवा मदत करणारे असे हे लोकं असतात. त्यांच्या या सरळसोप्या वर्तवणुकीमुळे ते वेगळे आहेत हे कोणी ओळखू शकत नाही त्यामुळे लोकांची फसगत होते आणि त्यांचा हेतू साध्य होतो.
आपण हा अभ्यास करणे आवश्यक आहे की, समाजात असे किलर कसे तयार होतात?
कोणतीही व्यक्ती जन्मतः खुनी नसते. त्यामागे अनेक सामाजिक आणि कौटुंबिक कारणे असतात.
बालपणातील आघात (Childhood Trauma) हा प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात घडलेला असतोच. लहानपणी झालेले लैंगिक शोषण, घरातील, जवळील नातेवाईक, शेजारी, ओळखीचे यांनी घेतलेला शारीरिक गैरफायदा, खूप क्रूरतेने बालपणी शिक्षा झालेली असणे, शारीरिक छळ झालेला असणे यामुळे बालमनावर खूप परिणाम झालेले असतात. पालकांकडून मिळणारी क्रूर वागणूक जसे की कोंडून ठेवणे, उपाशी ठेवणे, कठोर शिक्षा देणे, मुलांसमोर पालकांनी चुकीचे वर्तन करणे, मुलांच्या मनात प्रचंड भीती अथवा न्यून गंड तयार होईल असे वातावरण असणे, मुलांच्या कोणत्याही तक्रारी अथवा त्रासाची पालकांनी दखल न घेणे यामुळे मुलांच्या मनात राग वाढत जातो, साचत जातो. हा राग अगदी स्वतःबद्दल, पालकांबद्दल, समाजाबद्दल, विशिष्ट प्रकारच्या लोकांबद्दल असू शकतो.
मॅडोनाल्ड ट्रायड (MacDonald Triad) म्हणजे मानसशास्त्रात असे मानले जाते की, लहानपणी प्राण्यांना क्रूरपणे मारणे, उशिरापर्यंत अंथरूण ओले करणे आणि आग लावण्याची प्रवृत्ती असणारी मुले भविष्यात हिंसक बनण्याची शक्यता असते. जीं मुले लहानपणी कोणत्याही क्रूरतेचा आनंद घेतात ते मानसिक दृष्टीने आजारी असतात.
सिरीयल किलर च्या मेंदूची रचना लक्षात घेता, काही संशोधनानुसार, सिरीयल किलरच्या मेंदूतील ‘अमिग्डाला’ (भावना नियंत्रित करणारा भाग) सामान्य लोकांपेक्षा वेगळा असतो. त्यांना स्वतःच्या कोणत्याही भावनांना मर्यादा घालता येत नाहीत. अती भावुक होणे, खूप रडणे, खूप चिडणे, मनात टोकाचा विसरता न येणारा तिरस्कार अथवा द्वेष वारंवार उफाळून येणे, समोरील व्यक्ती चा मृत्यू हेच आपल्यावरील अन्यायाचे समाधान अथवा उपाय ही विचार शैली त्यांच्या मनात पक्की रुजलेली असते.
आता आपण बघू की, सिरीयल किलरची लक्षणे कोणती आणि त्यांना कसे ओळखायचे?हे लोक ओळखणे कठीण असते कारण ते समाजात मिसळून राहतात. तरीही काही सूक्ष्म लक्षणे दिसू शकतात जसे की, दुहेरी व्यक्तिमत्व म्हणजे ते बाहेरून खूप सभ्य, मदत करणारे दिसतात, पण प्रत्यक्षात त्यांचे खासगी आयुष्य खूप वेगळे आणि गुप्त असते. ते एकांतात खूप वेगळ्या पद्धतीने वागत असतात. खोटे बोलण्याची सवय हा एक गुणधर्म त्यांच्यात असतो. अश्या लोकांना मोठया प्रमाणात सराईतपणे खोटे बोलण्याची सवय असते ज्यामुळे ते सहज विश्वास संपादन करतात आणि कोणालाही सहज जाळ्यात ओढतात. या लोकांमध्ये प्राण्यांप्रती खूप क्रूरता असते. जर एखादी व्यक्ती विनाकारण मुक्या प्राण्यांना त्रास देत असेल, तर ते हिंसक प्रवृत्तीचे लक्षण असू शकते. यावरून आपण ओळखू शकतो ही व्यक्ती सर्वसामान्य नाही. भावनिक शून्यता हे सुद्धा विकृतीचे लक्षण आहे. भावनिक शून्यता म्हणजे इतरांच्या दुःखात त्यांना काहीच वाटत नाही किंवा अश्या वेळी ते कृत्रिम अथवा खोट्या भावना व्यक्त करतात. खोटी सहानुभूती दाखवतात पण मनातून आसुरी आनंद घेत असतात.
सिरीयल किलर लोकांना वेळीच सुधारण्याच्या उपाययोजना समजून घेणे गरजेचे आहे.
एकदा का कोणी सिरीयल किलरच्या मानसिकतेत शिरला की, त्याला पूर्णपणे सुधारणे कठीण असते, कारण त्यांच्या मेंदूतील वायरिंग बदललेले असते. ते मोठया प्रमाणातील खोलवर रुजलेल्या मानसिक आजाराचे शिकार असतात.
तरी यासाठी प्रतिबंधात्मक उपाय नक्कीच करता येतात. मुलांचे बालपण सुरक्षित करणे, मुलांना हिंसक वातावरणापासून दूर ठेवणे आणि त्यांच्यावर प्रेमळ संस्कार करणे हा सर्वात मोठा उपाय आहे. कोणत्याही व्यक्ती चे बालपण जितके सुरक्षित, संस्कारी, नॉर्मल असेल तितका तो कोणत्याही मानसिक आजारापासून दूर राहू शकतो. एखाद्या व्यक्तीत थोडीफार जरी विकृत, विचित्र वागणूक दिसली तरी सातत्याने मानसिक समुपदेशन करत राहणे आवश्यक असते. जर मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती दिसत असेल, त्यांची नजर, हावभाव, देहबोली इतर मुलांपेक्षा वेगळी वाटतं असेल तर तातडीने मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे. नागरिकांची सामाजिक सतर्कता सुद्धा खूप महत्वाची आहे. समाजात वावरताना संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष न करणे आणि कायद्याची कडक अंमलबजावणी असणे गरजेचे आहे. कोणालाही कुठेही कोणत्याही व्यक्तीची विचित्र हालचाल जाणवली तर सतर्क होणे, आपल्या घरात, शेजारी, कार्यालयात, ओळखीत कुठेही कोणाची असामान्य वर्तवणूक आढळल्यास पोलिसांना कळवणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे सगळ्यांचे कर्तव्य आहे.
सिरीयल किलर हे समाजासाठी एक आव्हान आहेत. त्यांना केवळ ‘राक्षस’ म्हणून न पाहता, ती एक गंभीर मानसिक विकृती आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. आजकाल संपूर्ण कुटुंबाला संपवणे, आपल्या स्वतःच्या सगळ्या लहान मुलांना मारून टाकणे, एकापाठोपाट एक खून करत सुटणे, अपहरण करून खून करणे या घटना घडण्यामागे पण अश्या मानसिकता दडलेल्या असतात. त्यामुळे आपण सामाजिक बांधिलकी जपत स्वतःची सुरक्षा सुद्धा जपत राहणे यावरील उत्तम उपाय आहे.
काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे
9766863443
Comments are closed.