NGN News
Latest Marathi News

हातभट्टीची दारू प्यायले.. दारूबंदी असलेल्या शेमळीत ७ जणांना विषबाधा

** श्रीकांत रौंदळ

सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क

तालुक्यातील जुनी शेमळी येथे हातभट्टीची दारू प्यायल्याने ७ जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी (दि.२४) रात्री उघडकीस आला. यातील दोघा जणांची प्रकृती सुधारली असली तरी इतरांवर खाजगी रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत.याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात असून या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

प्राप्त माहितीनुसार, जुनी शेमळी येथील ७ जणांनी बुधवारी रात्री गावाबाहेरून कुठून तरी हातभट्टीची दारू आणून ती प्राशन केली.गावातीलच रहिवाशी अमृत जगताप (४३)साजन लोंढे (३०)प्रवीण पवार (३५) राहुल पवार (३२) अजय पवार(४०) शरद पवार (५२)योगेश पगारे (४२) या सातही जणांनी या दारूचे अति सेवन केले. यानंतर अचानकच त्यांची प्रकृती बिघडली.त्यामुळे कुटुंबीय व ग्रामस्थांनी तात्काळ सगळ्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.यापैकी काही जणांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी रुग्णालयात तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तपास केला.यापैकी दोघा जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना गुरुवारी(दि.२५) सकाळी सोडून देण्यात आले. उर्वरित बाधितांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामपंचायतीने दारूबंदी केली असून तरीही या व्यक्तींनी दारू कुठून आणि कशी प्राप्त केली याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.

Comments are closed.