- गुरुवारी सकाळी ११ वाजता पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
** अंबादास बेनुस्कर
पिंपळनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, माजी मंत्री तथा नवापूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुरूपसिंगजी हिऱ्या नाईक यांचे वृद्धापकाळमुळे बुधवारी निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. 1970 ते 2025 पर्यंत इतका दीर्घकाळ राजकारणात सक्रिय असलेले ते शीर्षस्थ नेते होते. त्यांच्या पश्चात दोन पत्नी, 5 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीष नाईक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अजित नाईक, दीपक नाईक हे त्यांचे चिरंजीव असून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ रजनी नाईक,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ॲड भिमा नाईक त्यांच्या स्नुषा आहेत. उद्या गुरुवारी सकाळी 11:00 वाजता सुत्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील नवागव हे त्यांचे जन्मगाव. जाणत्या वयात आल्यापासून अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसचे निष्ठावान पाईक व गांधी परिवाराशी सर्वाधिक जवळीक असलेले नेते म्हणून सुरुपसिंग नाईक हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होते. काँग्रेस पक्षातूनच 1975 पासून 2009 पर्यंत सलग नवापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार पदी निवडून आले. यादरम्यान महाराष्ट्र राज्य सरकारच्या प्रत्येक मंत्रिमंडळात मंत्रीपदावर राहिले. परिवहन मंत्री, वनमंत्री, आदिवासी विकास मंत्री अशा विविध खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला. सहकार शिक्षण तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या हितासाठी त्यांनी अखंडपणे कार्य केले. उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे.
—-
@ सुरूपसिंग नाईक हे आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे एक लढवय्ये नेतृत्व होते.त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत विविध खात्यांचा कार्यभार अत्यंत समर्थपणे सांभाळला.आदिवासी विकास,ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा,शिक्षण व कृषी क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या हितासाठी त्यांनी अखंडपणे कार्य केले.नंदुरबार जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
Comments are closed.