NGN News
Latest Marathi News

गुंतवणुकीतून आकर्षक मोबदल्याच्या नावाखाली २५ जणांना २.९१ कोटींना गंडा

  • रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्याचा समावेश

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करून आकर्षक मोबदला मिळवून देण्याच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा बलाच्या सहायक उपनिरीक्षकसह २५ जणांना तब्बल २ कोटी ९१ लाख रुपयांना गंडवल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी संशयित ओमप्रकाश यादव नामक व्यक्तीच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, रेल्वे सुरक्षा बलात सहायक उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले असलम सरदार शाह ( रा. सिन्नर फाटा, नाशिक रोड ) यांची त्यांच्याच एका सहकाऱ्यामार्फत संशयिताशी ओळख झाली. संशयिताने शाह यांना शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करण्याचा सल्ला देत बंकेपेक्षा अधिक आकर्षक मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवले. आपण एंजल ब्रोकिंग, झिरोदा, एसएमसी ग्लोबल आदी कंपन्याचा एजंट असल्याचा बनाव करीत ओमप्रकाश यादव याने शाह यांना आर्थिक गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. त्यावर मोठ्या गुंतवणुकीसाठी पैसे नसल्याचे कारण शाह यांनी पुढे केले असता संशयिताने जेलरोड येथील स्टेट बँकेत आपली ओळख असल्याचे सांगत तेथून वैयक्तिक कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन शाह यांना दाखवले. त्यानुसार, संशयिताने शाह यांना बँकेत नेऊन कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांच्या नावे १० लाखाचे कर्ज मंजूर करून दिले. कर्जाची रक्कम शाह यांच्या खात्यात येताच ती आरोपीने स्वतःच्या खात्यात वर्ग करण्यास भाग पडले. त्यानंतर मात्र तो बेपत्ता झाला.

शाह यांनी अधिक माहिती घेतल्यानंतर त्यांच्या प्रमाणेच तब्बल २५ जणांची अशाच प्रकारे फसगत झाल्याचे उघड झाले. टी एकूण रक्कम २ कोटी ९१ लाख इतकी असल्याची माहितीही पुढे आली. शाह यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात धाव घेत संशयित ओमप्रकाश यादव याच्याविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed.