NGN News
Latest Marathi News

पंचवटीतील विवाहिता आत्महत्येमागे कौमार्य चाचणीचे कारण ?

  • अंनिसचा संशय; जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावण्याची मागणी

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवविवाहिता नेहा बापू डावरे उर्फ नेहा संतोष पवार या महिलेने सात पानी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. आत्महत्येची अनेक कारणे तिने सांगितली आहेत परंतु सदर महिलेची कौमार्य चाचणी घेतले गेली हे मुख्य कारण असल्याचा संशय अंधश्रद्धा निर्मुलन समिती ( अनिस ) ने व्यक्त केला आहे.

सदर महिलेला मासिक पाळीबद्दल समस्या होत्या. शरीरसंबध करतेवेळी रक्तस्त्राव झाला नाही म्हणून नवर्‍याने तिच्यावर चारित्र्यचा संशय घेतला व तिला त्रास देणे सुरु केले. काही दिवसानंतर तिला मासिक पाळी आली असता तिच्या सासुच्या सांगण्यावरुन नणंदेने सॅनेटरी पॅड लावून तपासले होते. इतकेच नव्हे तर तिच्या नवर्‍याने स्वतःचे बनियान फाडून रक्तस्त्राव होत आहे का तेही तपासले. सदरचा सर्व तपशिल आत्महत्येपुर्वी पिडीतेने लिहीलेल्या चिठ्ठीत आलेला आहे. त्यामुळे सदर महिलेची कौमार्य चाचणी व चारित्र्याचा संशय यामुळे तिचे खच्चीकरण झाल्याचे व तेथुनच तिला मानसिक व शारीरिक त्रास झाल्याचा संशय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यक्त केला आहे.

सदर महिलेवर जादुटोणा करण्याचे प्रकार घडलेले आहे. अज्ञात भोंदुबाबाच्या सांगण्यावरुन नागाचा आकार असलेल्या खिळ्याला बिब्बा लावून जादुटोणा करण्याचे फोटो करण्याचे फोटो सदर महिलेने प्रसारित केले आहे. शिवाय पायाच्या बोटामध्ये मंथरलेले लोखंडाचे जोडवे घालण्यास भाग पाडले. त्यामुळे संशयित आरोपीविरूध्द सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा व जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावावेत व त्या भोंदुबाबाला सहआरोपी करावे, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांना दिले आहे. निवेदनावर अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ.टी.आर. गोराणे,राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे,शहर कार्याध्यक्ष कोमल वर्दे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Comments are closed.