NGN News
Latest Marathi News

भारतीय महानुभाव परिषदेचे उद्यापासून अधिवेशन; मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

  • पंचवटीतील जय शंकर फेस्टीव्हल लॉन्स येथे आयोजन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे ३८ वे अधिवेशन नाशिक शहरात शनिवार ( दि. २५) आणि रविवारी ( दि. २६) रोजी आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी दुपारी १२ ते १ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. जय शंकर फेस्टीव्हल लॉन्स , छ. संभाजीनगररोड, जेजुरकर मळा, पंचवटी, येथे होणाऱ्या या सोहळ्याला अ.भा. महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कविश्वर कुलाचार्य विद्वांसबाबा शास्त्री (फलटण) यांच्याकडून नियोजित अध्यक्ष महंत मोहनराज कारंजेकर बाबा (अमरावती ) हे पदभार स्वीकारणार आहेत. महंत मोहनराज कारंजेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे स्नेही असून महंत कारंजेकर यांच्या पाठपुराव्यामुळे महानुभाव पंथातील अनेक मागण्या गेल्या काही वर्षांमध्ये मान्य झाल्या आहेत , असे म्हटले जाते. आता उर्वरित महत्त्वाच्या मागण्या प्रामुख्याने तीर्थस्थानांचा विकास व अन्य मागण्या देखील मार्गी लागतील , अशी अपेक्षा या अधिवेशनाच्या संयोजकांद्वारे व्यक्त करण्यात येत आहे.

अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे नाशिक जिल्ह्यात मौजे सुकेणे येथे सन १९१४ मध्ये अधिवेशन पार पडले होते. त्यावेळी अखिल भारतीय धर्मोन्नती परिषद असे या परिषदेचे नाव होते. कालांतराने अखिल भारतीय महानुभाव परिषद असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर १९६० मध्ये अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे १० वे अधिवेशन नाशिकरोड मुक्तिधाम परिसरात पार पडले होते. सन २०१२ मध्ये पुन्हा एकदा डोंगरे वस्तीगृहाच्या मैदानावर अधिवेशन अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अधिवेशन झाले होते. त्यानंतर आता चौथ्यांदा नाशिक जिल्ह्याला अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अधिवेशन घेण्याचा मान मिळत आहे.

विशेष म्हणजे अखिल भारतीय महानुभाव संमेलन नाशिकच्या डोंगरे वस्तीगगृह मैदानावर ऑगस्ट महिन्यात २०२२ मध्ये झाले होते. त्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये गुजरात राज्यात अखिल भारतीय महानुभाव संमेलन आयोजित करण्यात आले होते. तसेच सप्टेंबर २०२४ मध्ये महाकवी कालिदास कला मंदिरामध्ये महानुभाव पंथाद्वारे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. गेल्या ४ वर्षात महानुभाव पंथाचे नाशिक शहरात आणि परिसरात सलग ४ ते ५ भव्य कार्यक्रम पार पडले आहेत. यामुळे पंथाच्या प्रचार प्रचाराच्या कार्यास तसेच अन्य महत्वाच्या प्रश्नांना बाबत जनजागृती होत आहे.

Comments are closed.