NGN News
Latest Marathi News

गुन्हेगारी रोखण्यासाठी समाजाचे योगदान महत्वाचे ( विशेष/मीनाक्षी जगदाळे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क

गुन्हेगारी (Crime) ही कोणत्याही समाजासाठी एक गंभीर समस्या आहे. केवळ कायदा आणि पोलीस यंत्रणेवर (Police System) गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी टाकणे पुरेसे नाही, तर या समस्येवर मात करण्यासाठी समाजाचे सक्रिय योगदान (Active Participation of Society) अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः लहान मुलं, तरुण आजकाल मोठया प्रमाणात गुन्हेगारी कडे वळताना दिसतात. या तरुण पिढीला अश्या चुकीच्या वाईट विचारांपासून दूर करणेसाठी समाजाने कंबर कसणे आवश्यक आहे. या मुलांचं मानसशास्त्र, स्वभाव, सवयी समजावून घेवून त्यांना वेळीच लगाम घातला नाही तर ही पिढी नजीकच्या भविष्यात गंभीर गुन्हेगार बनतील जे सर्व समाजासाठीच धोकेदायक असेल.

समाज म्हणून आपण प्रत्येकाने जागरूक राहून आणि जबाबदारीने वागून गुन्हेगारी कमी करण्यात मोठा हातभार लावू शकतो. संस्कार आणि मूल्यांची रुजवणूक आपल्या घरापासून होणे अपेक्षित आहे. कुटुंब आणि शिक्षणसंस्था खूप मोठा सक्रिय सहभाग गुन्हेगारी थांबवण्यासाठी घेवू शकतात. गुन्हेगारीचे मूळ अनेकदा संस्कार आणि मूल्यशिक्षणाच्या अभावात असते. कुटुंबाने मुलांवर चांगले संस्कार करणे, त्यांना नीतिमत्ता (Morality), प्रामाणिकपणा आणि इतरांबद्दल आदर शिकवणे महत्त्वाचे आहे. शाळा आणि महाविद्यालयांनीही केवळ पुस्तकी ज्ञानावर नाही, तर विद्यार्थ्यांना सुसंस्कृत नागरिक बनवण्यावर लक्ष केंद्रित करावे असे वाटते.

सकारात्मक वातावरण सगळीकडे असणे गरजेचे आहे. घरात आणि आजूबाजूला सकारात्मक आणि सुरक्षित वातावरण निर्माण केल्यास व्यक्ती नकारात्मक प्रवृत्तींपासून दूर राहतात. सामाजिक जाणीव आणि सतर्कता यामुळे गुन्हेगारी संपुष्टात येण्यास मदत होते. शेजारधर्म पाळणे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. आपल्या आजूबाजूला काय चालले आहे याबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे. आपण समाजाचा ऐक जागरूक घटक म्हणून कोणत्याही चुकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आता चालणार नाही.

अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्ती दिसल्यास पोलिसांना कळवणे, तसेच शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवून एकमेकांना मदत करणे हा प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. वेळीच अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, अत्याचार सहन करत राहून गुन्हेगारांचे मनोबल न वाढवणे ही बाब पण लक्षात घेतली पाहिजे. समाजात होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचार किंवा गैरप्रकारांविरुद्ध लोकांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. शांत राहणे म्हणजे गुन्हेगारांना प्रोत्साहन देणे होय. दुसऱ्याच्या घरी, इतरांच्या बाबतीत काही गुन्हा घडल्यास मला काय करायचं आहे, मी सुरक्षित आहे न, कश्याला कोणाच्या भानगडीत पडायचं हि बघ्या ची भूमिका आता बदलणे आवश्यक आहे.

आर्थिक आणि सामाजिक समानता असेल तर गुन्ह्यांची संख्या नक्कीच कमी होईल. रोजगाराच्या संधी, शिक्षणाच्या संधी मिळून बेरोजगारी (Unemployment) दूर होणे गरजेचे आहे. गरिबी आणि आर्थिक विषमता (Economic Inequality) अनेकदा गुन्हेगारीला जन्म देतात. समाजाने गरजू आणि वंचित घटकांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सरकारने, उद्योजकांनी, मोठया आस्थापना यांनी अश्या युवा पिढीला प्रशिक्षित करून रोजगार दिल्यास त्यांचे चुकीचे मार्ग बदलू शकतात.

पुनर्वसन (Rehabilitation) हा मुद्दा सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे. शिक्षेनंतर समाजात परतलेल्या गुन्हेगारांना स्वीकारणे आणि त्यांना सन्मानाने जगण्यासाठी मदत करणे, त्यांच्या पुनर्वसनासाठी समाजाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. यामुळे ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळणार नाहीत. तरुणांना योग्य दिशा दाखवणे, त्यांचे मार्गदर्शक बनने फायदेशीर ठरते.
मार्गदर्शन आणि समुपदेशन (Counselling) आजच्या तरुण मुलांसाठी उपलब्ध असणे देखील मोठा हातभार लावू शकते. तरुणांना योग्य मार्गदर्शन करणे, व्यसनांपासून दूर ठेवणे आणि त्यांची ऊर्जा विधायक कामांमध्ये लावणे आवश्यक आहे. त्यांच्या समस्या समजावून घेण्यासाठी समुपदेशन केंद्रे आणि सामाजिक संस्थांनी सक्रिय असणे मोलाचे आहे. या युवा पिढीचे भवितव्य परत गुन्हा करण्यात जाऊ नये, त्यांचं आयुष्य गुन्हेगारी मुळे बिघडू नये यासाठी त्यांच्यातील हि वृत्ती समूळ नष्ट करणेसाठी समुपदेशन होणे आवश्यक आहे.

समाजाने कायदा आणि पोलिसांना सहकार्य करत राहणे, पोलिसांना वेळोवेळी माहिती पुरवणे आज काळाची गरज आहे. गुन्हेगारीबद्दलची कोणतीही माहिती न घाबरता पोलिसांना देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. साक्षी-पुरावे (Evidence) देण्यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. सामाजिक संस्थांची भूमिका सुद्धा यामध्ये सक्रिय आहे. अनेक सामाजिक संस्था गुन्हेगारी प्रतिबंधासाठी, पीडितांना मदत करण्यासाठी आणि कायदेशीर साक्षरता (Legal Literacy) वाढवण्यासाठी काम करतात. अशा संस्थांना समाजाने सहकार्य करावे. कोणाच्याही दबावाला, धमकी बळी न पडता, स्वतःच्या सामाजिक प्रतिमेला तडा जाईल म्हणून कायदेशीर कारवाई न करता सगळं सहन करत राहणे किंवा पाहत राहणे आता टाळले पाहिजे. पोलीस स्टेशन ला जाणे, तक्रार देणे, त्यासाठी कोर्ट कचेरी करावी लागल्यास त्यात सहभागी होणे यात कुठलीही भीती अथवा कमीपणा नसावा. आज आपण या गोष्टी टाळत गेलो तर भविष्यात आपल्याच मुला बाळांना भयानक गुन्हेगारी चा सामान करावा लागेल.

थोडक्यात, गुन्हेगारीमुक्त समाज (Crime-free Society) निर्माण करणे हे सामूहिक जबाबदारीचे कार्य आहे. कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांना समाजाकडून मिळणारा आधार, सहकार्य आणि सामूहिक प्रयत्न हेच गुन्हेगारी रोखण्यासाठीचे सर्वात मोठे बळ आहे. जेव्हा समाज सक्रियपणे गुन्हेगारी रोखण्यासाठी उभा राहतो, तेव्हाच एका सुरक्षित आणि सुदृढ राष्ट्राची निर्मिती होते. कायदा सुव्यवस्थेचा आदर करणे, त्यावर विश्वास ठेवणे, संयम ठेवून पाठपुरावा करून अपेक्षित कारवाई होणेसाठी प्रयत्नशील राहणे नागरिकांची जबाबदारी आहे. असे केल्यास आपण सर्वजण मिळून अधिक सुरक्षित समाज घडवू शकतो.

काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे
हॅपी लाईफ काउनसेलिंग सर्विसेस, नाशिक.
9766863443

Comments are closed.