सरासरी भाव : ₹१,०५० प्रति क्विंटल; दरात आणखी घसरण होण्याची भीती
** राकेश बोरा
लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क
आशिया खंडातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठेतील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शुक्रवारी कांद्याला सरासरी ₹१,०५० प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.दीपावली निमित्त बाजार समिती ७ दिवस बंद राहणार असल्याने बाजार समिती सुरू झाल्यानंतर आवक वाढण्याची शक्यता असल्याने दरात आणखी घसरण होण्याची भीती शेतकरीवर्गात व्यक्त होत आहे.
यंदा परतीच्या पावसाने नाशिकसह आसपासच्या भागात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या चाळीत साठवलेला उन्हाळी कांदाही ओलसरपणामुळे खराब झाला आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती, तर दुसरीकडे कांद्याचे घसरलेले दर अश्या दुहेरी संकटामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.
लासलगाव बाजार समितीत सध्या उन्हाळी कांद्याबरोबरच नव्या लाल कांद्याची आवक वाढू लागली आहे. दिवाळीनंतर बाजार पुन्हा सुरू झाल्यावर ही आवक आणखी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. परंतु हा नवीन कांदा टिकाऊ नसल्याने शेतकऱ्यांना तो जास्त दिवस साठवून ठेवणे शक्य नाही. त्यामुळे बाजार उघडताच कमी भावात कांदा विकण्याची वेळ अनेकांवर येणार आहे.
तिहेरी संकटामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात
दरम्यान, नाफेडकडून शहरी भागात स्वस्त दरात कांद्याची विक्री सुरू करण्यात आली आहे. या विक्रीमुळे खुल्या बाजारातील दरावर दबाव येत असून, त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आधीच भाव घसरलेले असताना नाफेडच्या स्वस्त विक्री धोरणामुळे दर आणखी खाली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.बाजार समिती सात दिवस बंद, परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान आणि नाफेडच्या विक्रीमुळे दरावर आलेला दबाव – या तिहेरी संकटामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याचे चित्र दिसत आहे. येथील मुख्य बाजार समितीत उन्हाळ कांद्याला किमान ४०० कमाल १४०० सरासरी १०५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाले.
Comments are closed.