नैराश्यात जावून टोकाचे पाऊल उचलल्याची पत्नीची पोलिसांत तक्रार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
उसनवारीने घेतलेल्या पैशाच्या वसुलीसाठी मित्राने लावलेल्या तगाद्याला कंटाळून एका व्यावसायिक तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरात उघड झाली आहे. अभिषेक अरुण महाजन ( ३५ वर्षे, रा. इंदिरानगर ) असे त्याचे नाव असून त्याच्या आत्महत्येप्रकरणी दोघा संशायितांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, अभिषेक हा काही वर्षांपूर्वी सातपूर औद्योगिक वसाहतीत नोकरी करीत होता. तेव्हा त्याची सागर आणि आकाश गायकवाड यांच्यासोबत मैत्री झाली होती. पुढे अभिषेक याने दहावा मैल येथे स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. मात्र, कोरोना काळात व्यवसायात मोठे नुकसान झाल्यानंतर त्याने दोन्ही मित्रांकडून २२ लाख इतक्या मोठ्या रकमेची उचल केली होती. त्यापैकी चार लाख अजूनही देणे असल्याने मित्रांनी त्याच्यामागे उर्वरित पैशाच्या वसुलीसाठी तगादा लावला होता. अनेकदा त्याला मित्रांनी दमदाटी केल्याचे अभिषेक याची पत्नी सायली यांनी नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यामुळेच नैराश्यात जावून अभिषेकने टोकाचे पाऊल उचलले. यासंदर्भात इंदिरानगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Comments are closed.