नाशिकच्या खेळाडूंचा स्पर्धेत वरचष्मा
नासिक : जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या अधिपत्याखाली आयोजित केशिका पुरकर महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या एकेरीत व १९ वर्षा खालील मुलाच्या गटात नाशिकच्या कुशल चोपडाने दुहेरी मुकुट पटकावला. महिला एकेरीत टीएसटीटीएच्या अनन्या चांदे,व १९ वर्षाखालील मुलींच्या गटात नाशिकच्या स्वरा करमरकर हिने अजिंक्यपद पटकावले.
१९ वर्षाखालील मुलींच्या गटात नाशिकच्या प्रथम मानांकित स्वरा करमरकरने अंतिम फेरीत पुण्याच्या नायशा नेवासकर हीचा ६-११, ११-७, १३-११, ४-११, ११-९, १५-१३ असा ४-२ ने पराभव करून अजिंक्यपद पटकावून नाशिकला पहिले सुवर्णपदक पटकावून दिले. १९ वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत नाशिकच्या कुशल चोपडाने प्रथम मानांकित पुण्याच्या ईशान खांडेकरचा ६-११, ११-८, ११-८, ७-११, ११-४, ११-८ असा ४-२ ने पराभव करून विजेतेपद पटकावले.
महिला एकेरीत प्रथम मानांकित टीएसटीएच्या अनन्या चांदे हिने नाशिकच्या सायली वाणीचा ११-२, ११-६, ८-११, १३-११, ४-११, ११-४ असा ४-२ ने पराभव करत विजतेपद पटकावले. पुरुष एकेरीत तेरावे मानांकन असणाऱ्या कुशल चोपडाने टीएसटीटीएच्या सागर कस्तुरे चा १२-१०, ८-११, १०-१२, ११-७, ११-१३, ११-५, ११-७ असा ४-३ ने पराभव करत विजयश्री प्राप्त केला. या झालेल्या अटीतटीच्या लढतीत दोन्हीही खेळाडूंनी आपले कसब दाखवत शेवटपर्यंत विजयाकडे वाटचाल सुरु ठेवली. कुशल ने सातवा गेम जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले. कुशलने हा सामना जिंकून दुहेरी मुकुट संपादन केला.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ ऑलिंपियन दत्तू भोकनळ, नासिक मर्चंट्स को. ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन हेमंत धात्रक, माजी चेअरमन सोहनशेठ भंडारी, संचालक आकाश छाजेड व नासिक जिमखाना सचिव राधेशाम मुंदडा यांच्या शुभ हस्ते पार पडला. विजेत्या खेळांडूंना रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक नरेंद्र छाजेड यांनी केले. या प्रसंगी व्यासपीठावर शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मुकुंद कुलकर्णी, अजय केवलरामानी, आदित्य गोगटे, श्रेयस महाजन मिलिंद जोशी आदि मान्यवर, पालक खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्यापासून १७ व १५ वर्षाखालील गटाच्या स्पर्धा
उद्या सोमवार दि. २२ तारखेपासून १७ व १५ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटाच्या स्पर्धेस सुरवात होणार आहे. या स्पर्धा दिवसभर चालणार असून नामांकित खेळाडूंचा यात सहभाग आहे. क्रीडा प्रेमी नागरिकांनी याचा जरूर आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले
Comments are closed.