NGN News
Latest Marathi News

सिडकोमधील पेढीतून बनावट पनीर, खवा साठा जप्त; ‘एफडीए’ची कारवाई

‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न’ सुरक्षिततेचा मोहिमेंतर्गत उचलले पाऊल

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न’ सुरक्षिततेचा या मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने मिठाई व तत्सम पदार्थ तपासणी मोहिम जिल्ह्यात सुरू केली आहे. या तपासणी मोहिमेत सिडकोमधील एका पेढीत एकूण 43 हजार 740 किंमतीचा पनीर व खवा यांचा साठा जप्त करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासनाला नाशिक येथील मे. विराज एंटरप्रायजेस, त्रिमुर्ती चौक, सिडको या पेढीमध्ये बनावट पनीर व खवा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार या पेढीची तपासणी करून पेढीमध्ये आढळून आलेला संशयित पनीरचा 129 किलो ग्रॅम व रूपये 38 हजार 700 किंमतीचा साठा तसेच 18 किलोग्रॅम रूपये 5 हजार 40 किंमतीचा खव्याचा साठा असा एकूण 43 हजार 740 रूपयांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या अन्न पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. व जप्त करण्यात आलेला पनीर व खव्याचा साठा हा नाशवंत असल्याने व परत उपयोगात येवू नये यासाठी त्यावर निळ टाकून नष्ट करण्यात आला आहे. प्रयोगशाळेकडून या अन्न पदार्थांचा अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.

सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील, उमेश सुर्यवंशी, अन्न सुरक्षा गुप्तवार्ता अविनाश दाभाडे यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न) मनिष सानप, सह आयुक्त (अन्न) दिनेश तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भेसळयुक्त अन्न पदार्थांसंदर्भात तक्रार तसेच गोपनीय माहिती असल्यास प्रशासनाच्या टोल फ्रि क्रमांक 1800222365 यावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Comments are closed.