आजारी सासूला कंटाळलेल्या सुनेचे दुष्कृत्य
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सासू-सुनेमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान गळा दाबून जीवनयात्रा संपवण्यापर्यंत झाल्याची हृदयद्रावक घटना देवळाली कॅम्प येथे आडकेनगरला उघडकीस आली आहे. घटनेत सुनेने ८९ वर्षीय सासूचा गळा दाबून तिची हत्या केली. या घटनेने खळबळ उडाली असून नाशिक रोड पोलिसांनी सुनेला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सदर घटना गेल्या २ सप्टेम्बर रोजी घडली. देवळाली कॅम्प मधील आडकेनगर येथे शेख कुटुंबीय राहतात. घटनेच्या दिवशी मृत सकीना गफार शेख ( ८९ ) यांना खाण्यासाठी विड्याचे पान आणावे, असे सकीना यांच्या दिराने आरोपी शबाना यांना सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून सासू आजारी असल्याने शबाना कंटाळल्या असल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यातूनच शबानाने पान आणून देण्यास नकार दिल्याने सासू-सुनेमध्ये जोरदार वादावादी झाली.
संतापाच्या भरात शबाना यांनी सासू सकीना यांचा गळा दाबला. अस्वस्थ सकीना यांना नाशिकरोड येथे बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र दुसऱ्या दिवशी ( दि. ३ ) त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी शबाना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Comments are closed.