- एकूण ९५,७५० रुपये किमतीचा ऐवज जप्त
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सारूळ शिवारात पोलिसांनी जिलेटीनचा मोठा साठा हस्तगत केला आहे. कारवाईत एका पत्र्याच्या शेडमध्ये अमोनियम नायट्रेटयुक्त जिलेटीनच्या कांड्यानी भरलेले बॉक्स आणि डीटोनेटर एकत्रितपणे आढळून आले. याप्रकरणी सात संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी ( दि. २ ) ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ग्रामीण श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथक यांच्या सहकार्याने छापा टाकून कारवाईचे सोपस्कार पूर्ण केले. उपरोक्त दोन्ही वस्तू घरात ठेवण्याचा संशयित आरोपींकडे परवाना आढळून आला नाही. कारवाईत जिलेटीनच्या कांड्या भरलेले ४९ बॉक्स जप्त करण्यात आले, ज्यामध्ये एकूण ६,१२५ जिलेटीन कांड्या, २२०० इलेक्ट्रिक डीटोनेटर१५० मित्र डीएफ वायर असा एकूण ९५,७५० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला . जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर , वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
संशयितांची नावे अशी :
गोरख बाजीराव ढगे, विकास नवले, ओमकार कैलास नवले, गौरव मोहन नवले, ( रा. सर्व सारूळ, ता. जि. नाशिक), दीपक दशरथ क्षीरसागर ( रा. शिगवे बहुला , ता. जि. नाशिक), अमित अजमेरा आणि कोठावदे ( पूर्ण नाव माहित नाही )
Comments are closed.