NGN News
Latest Marathi News

चेहेडीत हजार रुपयांची लाच घेताना तलाठी ताब्यात

सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी स्वीकारली रक्कम

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना चेह्डीत तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. गौरव शंकर दवंगे ( ३१ वर्षे, रा. अक्षर बंगला, निसर्ग नगर, म्हसरूळ) असे लाचखोर तलाठीचे नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, चेहेडी गावातील एका वयोवृद्ध महिलेकडे सर्वे क्र. ४/१/ह/प्लॉट/११, क्षेत्रफळ ११९.५३१ चौ.मी. एवढा प्लॉट होता. वयोमानानुसार तिने हा प्लॉट आपल्या अपंग मुलगी आणि मुलाच्या नावावर बक्षीस पत्राद्वारे नोंदविला. या प्रक्रियेसाठी तिने आपल्या भावाला सर्व कागदपत्रे सादर करण्याचा अधिकार दिला होता. भावाने आवश्यक दस्तऐवज संबंधित तलाठी कार्यालयात दाखल केले. मात्र लाचखोर तलाठी गौरव दवंगे यांनी सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे भावाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.

तक्रारीची खात्री करून गुरुवार ( दि. २८ ) रोजी दुपारच्या सुमारास चेहेडी तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने पैसे देताच लाचखोर तलाठी दवंगे याने ती लाच स्वीकारली आणि त्याच क्षणी पथकाने साक्षीदारांच्या उपस्थितीत त्याला रंगेहाथ पकडले.

Comments are closed.