NGN News
Latest Marathi News

सप्तशृंगगडावर आगामी नवरात्रोत्सव नियोजनासाठी बैठक

  • स्वच्छता, आरोग्य, बस सेवा आदी मुद्द्यांवर प्रशासनाच्या कठोर नियोजन करणेबाबत सूचना

सप्तशृंगगड │ रघुवीर जोशी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंग गडावर होणाऱ्या नवरात्रोत्सव २०२५ साठी प्रशासनाने व्यापक नियोजनाला सुरुवात केली आहे. (दि. १९) रोजी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या चिंतन हॉलमध्ये झालेल्या प्राथमिक आढावा बैठकीत विविध विभागांना कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

स्वच्छता व कचरा व्यवस्थापन

भाविकांच्या प्रचंड गर्दीचा विचार करून ग्रामपंचायत, ट्रस्ट व रोपवे प्रशासनाने स्वच्छतेवर विशेष भर द्यावा, असे निर्देश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आकुनरी नरेश व तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी दिले.

रोपवेच्या कामावर प्रश्नचिन्ह….

बैठकीत रोपवे प्रशासनावर प्रश्न उपस्थित झाले. वर्षभरात प्लास्टिकबंदी व स्वच्छतेसंदर्भात कोणती कार्यवाही केली, याबाबत विचारले गेले. तसेच CSR फंडांतर्गत स्वच्छतेसाठी उपाययोजना का होत नाहीत, तसेच रोपवे कार्यालयाचे ऑडिट करण्याची मागणीही यावेळेस झाली.

वाहतूक आणि सुरक्षा

यात्राकाळात नांदुरी–सप्तशृंग गड दरम्यान एस.टी. महामंडळाच्या अतिरिक्त बसफेऱ्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नवीन प्रकारातील वाहने, क्रेन तसेच आपत्कालीन व्यवस्थेची तयारी ठेवण्याचे आदेश देण्यात आले. बस चालक अनुभवी असावेत आणि बसांची तांत्रिक तपासणी करूनच कार्यात कराव्या. दरम्यान घाटमार्गाच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करून भाविकांना गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

आरोग्य सुविधा

नवरात्रोत्सव काळात प्राथमिक आरोग्य केंद्र व दवाखाने सज्ज ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागास देण्यात आले. वैद्यकीय अधिकारी, औषधसाठा तसेच मंकी बाईटसारख्या आजारांवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

बैठकीत महत्त्वाचे मुद्दे –

  1. गडावर प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे,
  2. मोबाईल टॉयलेटची स्वच्छता व्यवस्थित व्हावी,
  3. घाट रस्त्याच्या भिंती व विद्युत पोल दुरुस्ती
  4. रिफ्लेक्टर व पिवळ्या दिव्यांची व्यवस्था करणे,
  5. रोडसाईड व्यवसायांवर नियंत्रण,
    अशी मागणी करण्यात आली.

तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी भाविक व ग्रामस्थांना आवाहन केले की, “अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.”

या बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आकुनरी नरेश, तहसीलदार रोहिदास वारुळे, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त ॲड. ललित निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, सरपंच रमेश पवार, ग्रामसेवक संजय देवरे, उपसरपंच संदीप बेनके, नांदुरी सरपंच, ग्रामसेवक वनविभाग अधिकारी, एस. टी महामंडळ प्रतिनिधी, एम.एस.सी.बी अधिकारी, व्यापारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

रस्ता व संरक्षण भिंती दुरुस्तीबाबत…
नांदुरी ते सप्तशृंगी गड या दहा किलोमीटरच्या घाट रस्त्याचे सध्या स्थितीत काँक्रिटीकरण व संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे यात काँक्रीटच्या रस्त्यांमधून दोन ते तीन फुटाचे गज बाहेर असून याचा त्रास यात्रा कालावधीत एसटी महामंडळ खाजगी वाहने यांना होऊ शकतो तसेच विविध ठिकाणी अर्धवट रस्ता असल्याने यात्रा उत्सव काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते तरी रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे.
संदीप बेनके उपसरपंच, ग्रामपंचायत सप्तशृंगगड.

———————————
@ गावातील व पायी मार्ग येथील विद्युत पोलचे स्ट्रक्चर व्यवस्थित नाही. सदरचे पोल यात्रा कालावधीत पडण्याची शक्यता आहे. तरी सदरचे पोलला योग्य स्ट्रक्चर करावे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घाट मार्गात रिफ्लेक्टर व पथदिवे हे सद्यस्थितीत पांढऱ्या रंगाचे आहेत. परंतु गडावर धुक्याचे प्रमाण अधिक असल्याने यामुळे येणाऱ्या भाविकांना अडचण होते. तरी सदरचे दिवे व रिफ्लेक्टर हे पिवळ्या रंगाचे असावे व घाट मार्गातील संरक्षण भिंती तयार करण्यासाठी केलेले खड्डे अद्याप पावेतो भरलेले नाही तरी ते भरावे.
सुदर्शन दहातोंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापक, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट.

Comments are closed.