- बनावट शिक्का, कागदपत्रांच्या आधारे फसवणूक; गुन्हा दाखल
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
उत्तराखंडमधील एक मालमत्ता आपल्या मालकीची भासवून मुंबईतील एका महिलेने नाशिकमधील व्यावसायिकाला तब्बल एक कोटीला गंडवल्याचा प्रकार उघड झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सदर महिलेने या प्रकरणात भारत सरकारचा बनावट शिक्का वापरला. याप्रकरणी इंदिरा नगर पोलीस ठाण्यात संशयित महिलेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नाशिकच्या गोविंदनगर येथील धीरज भवरलाल काबरा असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. उत्तराखंड मध्ये रुरकी शहरात आपल्या मालकीचे गेस्ट हाऊस असल्याचा बनाव मुंबईच्या भांडूपमध्ये वास्तव्यास असलेल्या अरुणा श्रीकृष्ण मोरे नामक महिलेने काबरा यांच्याशी झालेल्या परिचयानंतर केला. ही मालमत्ता विक्रीस काढण्यात आल्याचे सांगून महिलेने एकत्रित मूल्य ४.६५ कोटी असल्याचे सांगितले. काबरा यांना विश्वास वाटावा म्हणून महिलेने बनावट शिक्के आणि कागदपत्रे सदर केले. या व्यवहारासाठी नाशिकच्या इंदिरानगर भागातील एका हॉटेलमध्ये संबंधित महिला आणि काबरा यांच्यात बैठकाही झाल्यात. अरुणा मोरे हिने काबरा यांच्याकडून उचल रकमेपोटी सुमारे एक कोटी रुपये घेतले. तथापि, अनेक दिवस होवूनही व्यवहार पूर्ण होत नसल्याने काबरा यांना संशय आला. सखोल चौकशी करता ती मालमत्ता अरुणा मोरे यांच्या नावे नसल्याचे उघड झाल्याने काबरा यांना धक्का बसला. त्यांनी मोरे हिच्याविरोधात इंदिरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणातील महिला फरार असून तिला स्थानिक स्तरावर कोणी मदत केली का, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत .
Comments are closed.