NGN News
Latest Marathi News

जनशांती धाम येथे चौथ्या श्रावणी सोमवारी कावड महाजलाभिषेक

रविवारी रामकुंड येथून कावड यात्रा; रात्री १२ वाजता महाअभिषेक

ओझर : अमर आढाव
अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी ओझर येथे निर्माण केलेल्या देवभूमी जनशांती धाम येथील श्री बाणेश्वर महादेव मंदिरात, रविवारी १७ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजता ब्रह्मवृद्धांच्या मंत्रघोषात महाजलाभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी रामकुंड येथून पायी चालत तीर्थ आणले जाणार आहे.

निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे पिठाधीश्वर अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत जय बाबाजी भक्त परिवाराच्या दरवर्षी चौथ्या श्रावणी सोमवारी भव्य कावड यात्रा व महाजलाभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते. याही वर्षी, रविवार १७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता रामकुंड येथून कावड यात्रा सुरू होईल. सायंकाळी ७ वाजता कावड यात्रेचे ओझर येथे आगमन होईल. जनशांती धाम चौक (दहावा मैल) येथे कावड यात्रेचे जंगी स्वागत होईल व मिरवणुकीने ओझर आश्रमात आगमन होणार आहे.

आश्रमात आगमनानंतर नित्यनियम विधी, आरती, सत्संग व महाप्रसाद वाटप होईल. रात्री १२ वाजता ब्रह्मवृद्धांच्या मंत्रघोषात, जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज व भगवान बाणेश्वर महादेवाचा महाजलाभिषेक संपन्न होणार आहे.

सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता पुन्हा महाअभिषेक संपन्न होईल. पहाटे ५ वाजता नित्यनियम विधी, भागवत वाचन, ध्यान, प्राणायाम, आरती व सत्संग होतील.यानंतर सकाळी ९ वाजता श्री पंचवड गणपती मंदिराजवळील बोगद्यापासून जनशांती धाम चौक (दहावा मैल) मार्गे आश्रमापर्यंत लक्षवेधी मिरवणूक काढण्यात येणार आहे.सकाळी ११ वाजता पुन्हा अभिषेक व दुपारी १२ वाजता नित्य नियम विधी,आरती,सत्संग, सायंकाळी ५ वाजता पुन्हा महाअभिषेक पूजन होईल.सायंकाळी ६.४५ वाजता विधी,आरती,सत्संगाने कार्यक्रमाची सांगता होईल.या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments are closed.