NGN News
Latest Marathi News

‘इको’ ची धडक; मुंजवाडला मॉर्निंग वॉकर महिला ठार, सहा जखमी

सटाणा : श्रीकांत रौन्दळ

बागलाण तालुक्यातील मुंजवाड- खमताने रस्त्यावर आज(१४ ऑगस्ट) रोजी सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिला व नागरिकांच्या समूहाला भरधाव वेगात आलेल्या इको गाडीने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सरला राजेंद्र जाधव यांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सटाणा येथील रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, रोजच्या प्रमाणे काही नागरिक सकाळी मॉर्निंग वॉक साठी सटाणा- मुंजवाड खमताने रस्त्यावर गेले होते. यावेळी सटाण्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या इको गाडीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना जबरदस्त धडक दिली. त्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले आणि जखमींना सटाणा येथील रुग्णालयात हलवले.

दरम्यान घटनेचे वृत्त समजताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास कार्य सुरू केले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेने शहरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Comments are closed.