NGN News
Latest Marathi News

नोकरीच्या आमिषाने युवतीला लाखोंचा गंडा; मंत्र्यांचा नातेवाईक असल्याचा बनाव

निफाड : एनजीएन न्यूज नेटवर्क

पोलीस दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून १९ वर्षीय युवतीला तब्बल साडेचार लाखांचा गंडा घालणाऱ्या भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या असल्याचे सांगणाऱ्या या भामट्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गुलाबराव पाटील तसेच खासदार श्रीकांत शिंदे हे आपल्या खूप जवळचे असल्याचा बनाव केला. अभिषेक प्रभाकर पाटील (रा. द्वारका, नाशिक) असे पोलिसानी अटक केलेल्या या भामट्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, स्वाती राजेंद्र चाबुकस्वार (१९, रा. बेघरवस्ती, औरंगपूर ता. निफाड) या युवतीला पोलीस खात्यात नोकरीस लावून देतो, असे आश्वासन देवून अभिषेक याने तिच्या माता-पित्यांचा विश्वास संपादन करून त्यापोटी ८ लाख रुपयांची मागणी त्याने चाबुकस्वार कुटुंबाकडे केली. पाटील याच्यावर विश्वास ठेवून स्वातीच्या कुटुंबीयांनी साडेचार लाख रुपये पोलीस होण्याच्या आशेने दिले. स्वातीला पोलिसांचा खोटा गणवेश, खोटी नंबरप्लेट तयार करून विविध मान्यवरांकडून स्वातीचा पोलीस म्हणून सत्कार करवून घेण्याची चलाखीही पाटील याने केली. पुढे मुंबईच्या दादर येथील महाबीर पोलीस अकॅडमीत पोलीस प्रशिक्षणासाठी स्वातीला दाखल केले. चाबुकस्वार परिवाराचा विश्वास संपादन करून पाटील याने अशा पद्धतीने पैशांची फसवणूक केली.

तथापि, सत्य बाहेर आल्यानंतर स्वातीच्या माता-पित्यांनी अभिषेक प्रभाकर पाटील याच्यावर सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास सुरु आहे.

Comments are closed.