लासलगाव : राकेश बोरा
लासलगावमधील सुकेणकर चाळ येथे एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या दोन महिला चोरट्यांपैकी एकास लासलगाव पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत पत्रकार उमेश पारीख यांच्या सतर्कतेने पोलिसांना तातडीने कारवाई करता आली.
ही घटना दिनांक ४ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. बाजारतळ परिसरातील सुकेणकर चाळ येथे राहणाऱ्या ७५ वर्षीय इंदुमती दत्तात्रय काळे या घरात एकट्याच होत्या. त्याचा फायदा घेत दोन अनोळखी महिला घरात शिरल्या. “केळी खा” असे सांगत एक महिला इंदुबाई यांच्याशी बोलण्यात गुंतली तर दुसरी महिला घराबाहेर येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवू लागली. त्यानंतर एकाने इंदुबाई यांच्याशी झटापट करत त्यांच्या गळ्यातील ३ ग्रॅम वजनाची, सुमारे २८ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून दोघी पळून गेल्या.
इंदुबाई यांच्या आरडाओरड ऐकून जवळच राहणारे TV-9 चे पत्रकार उमेश पारीख यांनी त्वरित लासलगाव पोलीस ठाण्याचे सपोनि भास्कराव शिंदे यांना घटनेबाबत माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.निरीक्षक साळुंखे, पो.हवा. निचळ, गोसावी, म.पो.हवा कदम, तळेकर आदींनी तत्काळ तपास सुरु केला.
पत्रकार उमेश पारीख यांच्या मदतीने आरोपींपैकी छाया आकाश कुन्हाडे (रा. सुमतीनगर, लासलगाव) हिला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत पळून गेलेली तिची सख्खी बहिण पूजा प्रविण कुन्हाडे असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी इंदुबाई यांचे चिरंजीव राजेंद्र काळे (रा. भाऊसाहेवनगर, निफाड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी छाया आणि पूजा कुन्हाडे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९(४), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, छाया कुन्हाडेला अटक करण्यात आली आहे. फरार असलेल्या पूजा कुन्हाडेचा पोलीस शोध घेत आहेत.
Comments are closed.