नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
पोलिस दलात खळबळ उडवणारी एक घटना उघडकीस आली आहे. भद्रकाली पोलिस ठाण्याच्या दुय्यम निरीक्षकाची इंदिरानगर पोलिस ठाण्यात नेमणूक करण्यासाठी तब्बल पस्तीस लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या अंमलदाराने दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलिसांत दोन संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, नाशिकरोड पोलिस ठाण्यातील एका अंमलदाराच्या फिर्यादीनुसार नितीन सपकाळे व सागर पांगरे-पाटील या दोन संशयितांविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंद आहे. गेल्या २४ जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास संशयित सपकाळे याने पाटीलसोबत संगनमत करून संबंधितअंमलदाराला ‘व्हॉटसॲप कॉल’वर ‘आपली वरपर्यंत ओळख असून, भद्रकालीचे सध्याच्या दुय्यम निरीक्षकांची इंदिरानगर पोलिस ठाण्यात ‘प्रभारी’ पदावर बदली करून देतो’, असे सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी सकाळी सपकाळे हा चांडक सर्कल परिसरात आला. त्याने अंमलदारासह निरीक्षकांना बोलावून घेतले. त्यावेळी चुंचाळे पोलिस ठाण्यात दोन अंमलदारही हजर होते. त्यावेळी संशयित पाटील हा ‘तुम्ही पैसे दिले नाहीत, तर मी कोठेही चांगल्या ठिकाणी बदली होऊ देणार नाही’, असे सांगून निघून गेला.
त्या दिवशी रात्री सव्वाआठ वाजता सपकाळेच्या मोबाइलवर अंमलदाराने फोन करून ‘रेकॉर्डिंग’ केली. तेव्हा ‘दुसरे निरीक्षक पस्तीस द्यायला तयार आहेत. मी पाच कमी करतो. तीसपेक्षा कमी होणार नाही. जर साहेब पंचवीसच्या वर द्यायला तयार नसतील, तर बदलीचे काम होणार नाही’, असा दावा सपकाळेने केला. त्यावरून अंमलदाराने पुराव्यांनिशी पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली आहे. या प्रकारानंतर मुंबई नाका पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, तो बांधकाम व्यवसाय क्षेत्राशी संलग्न असल्याचे कळते.
Comments are closed.