NGN News
Latest Marathi News

त्र्यंबकला ऑनलाईन दर्शन पासेसचा काळाबाजार; पाच जण जेरबंद

त्र्यंबकेश्वर : एनजीएन न्यूज नेटवर्क

देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तीच्या नवे लूट करण्यात येत असल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानुसार, बनावट नावे आणि ओळखपत्रांच्या आधारे ऑनलाईन दर्शन पास मिळवून त्याचा काळाबाजार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संबंधित पाच जणांच्या टोळीने आतापर्यंत पाच हजाराहून अधिक भाविकांना गंडवल्याचे पोलीस तपासाअंती उघड झाले आहे.

सद्यस्थितीत त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोफत आणि दोनशे रुपये देणगी पास अशा दोन श्रेणीतील रांगांतून भाविकांची दर्शनाची सोय करण्यात येत आहे. तथापि, देणगी पासच्या ऑनलाईन बुकिंग प्रणालीतील त्रुटींचा फायदा उचलत ही टोळी कार्यरत होती. पोलीस आणि मंदिर प्रशासनालाही त्याची कुणकुण लागली होती. त्यानुसार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी यांनी त्याची गंभीर दखल घेतली आणि स्थानिक पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी सापळा रचून त्रंबकेश्वर परिसरातून पाच संशयितांना ताब्यात घेतले.

पाच हजार भाविकांना गंडा

ताब्यात घेण्यात आलेल्या टोळीतील पाचही जणांविरुद्ध संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात या टोळीने तब्बल १,६४८ बनावट देणगी पास काढल्याचे आणि त्याद्वारे अंदाजे ५,००० भाविकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईमुळे मंदिराच्या ऑनलाईन पास प्रणालीतील गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. या प्रणालीत तातडीने आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आश्वासन मंदिर प्रशासनाने दिले आहे.

अशी होती मोडस ओपरंडी..

ताब्यात घेतलेल्या पाच जणांच्या टोळीची कसून तपासणी केली असता अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. त्यांच्या मोबाईल फोन आणि ईमेलची तपासणी केली असता ते बनावट नावे, पत्ते आणि खोट्या ओळखपत्रांचा वापर करून शेकडो ऑनलाईन पास बुक करत असल्याचे उघड झाले. त्यानंतर, दर्शनासाठी आलेल्या गरजू भाविकांना हेरून २०० रुपयांचा अधिकृत पास तब्बल ७०० ते १,००० रुपये या चढ्या दराने विकून त्यांची लूट करत होते.

Comments are closed.