
- स्पेशल सूट 365 दिवस खरातच्या नावावर बुक
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याचे कार्यक्षेत्र केवळ नाशिक नव्हते, अशी नवी माहिती तपास यंत्रणेच्या परिघात आली आहे. ‘हवाला’ रॅकेटच्या माध्यमातूनही आपले जाळे विणल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी मुंबईमधील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलचा वापर केला जात होता. या हॉटेलमध्ये दिवसाला 25 हजार रुपये भाडे असलेला एक स्पेशल सूट वर्षाचे 365 दिवस खरातच्या नावावर बुक असायचा, अशी धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
या नव्या खुलाशामुळे खरात प्रकरणात आता आंतरराष्ट्रीय धागेदोरे मिळण्याची शक्यता गडद झाली आहे. याच आलिशान रूममधून कोट्यवधी रुपयांच्या हवाला व्यवहारांची देवाण-घेवाण आणि आखणी केली जात होती. हवाला रॅकेटचा पैसा थेट दुबईपर्यंत पोहोचत असल्याचा संशय असून या प्रकरणाची व्याप्ती राज्याच्या सीमा ओलांडून परदेशापर्यंत पसरलेली असल्याने, एसआयटी आता त्या दिशेने कसून तपास करत आहे.
‘त्या’ महिलांना प्रचंड मानसिक धक्का
दरम्यान, खरातच्या मायाजालात अडकलेल्या आठ ते नऊ पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. त्यासाठी त्यांनी मानसोपचार तज्ञांची मदत घेतल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अनेक महिला घरातच एकट्या राहत असून नैराश्याच्या सावटाखाली असल्याचेही समजते. या पार्श्वभूमीवर विशेष तपास पथकाने महिलांना कोणतेही दडपण न घेण्याचे आवाहन करत त्यांना पूर्ण सुरक्षा देण्याची ग्वाही दिली आहे. पीडित महिलांची अज्ञातस्थळी चौकशी करण्यात येत असून त्यांचा मानसिक त्रास लक्षात घेऊन संवेदनशील पद्धतीने प्रकरण हाताळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भोंदू अशोक खरात आणि पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांनी थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. तसे सायबर पोलिसांकडून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर सातत्याने नजर ठेवली जात आहे.
पतसंस्था दोन .. खाती १३२
अशोक खरात नॉमिनी असलेल्या १३२ पतसंस्था खात्यांच्या प्रकरणाबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. राहाता येथील समता पतसंस्थेत १००, तर सिन्नरच्या कुंदेवाडी येथील जगदंबा पतसंस्थेत ३२ खाती असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर पोलिसांना याबाबत धक्कादायक माहिती देत कबुली दिली आहे.
Comments are closed.