
- प्रेमात फसवल्याच्या नैराश्यातून गंगापूर रोडवरील वरुणने संपवली जीवनयात्रा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘तिने मला प्रेमात फसवले, हवी तेव्हढी कॅश काढून घेतले अन् मला धमकावून तू मर नाही तर…’ असे सांगून रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा आरोप ‘सुसाइड नोट’मध्ये करत एका वरुण भाऊसाहेब भामरे (२६, रा. गोकुळधाम, ध्रुवनगर, गंगापूर) याने गुरुवारी (दि.२०) सायंकाळी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत वरुणने प्रेयसीसह तिघांवर गंभीर आरोप केले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, गंगापुररोडवरील ध्रुवनगरमध्ये राहणाऱ्या वरुणचे एका युवतीवर प्रेम होते. मात्र, गुरुवारी त्याने याप्रकारातून जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने प्रेयसीसह तिघांवर गंभीर आरोप केले. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे चिठ्ठीतून त्याने न्यायाची मागणी देखील केली आहे. ‘तिने मला प्रेमात फसवले, हवी तेव्हढी कॅश काढून घेतले अन् मला धमकावून तू मर नाही तर…’ असे सांगून रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा आरोप त्याने केला. वरुण याने आयटीआयपर्यतचे शिक्षण घेतले होते. तो आपल्या कुटुंबासमवेत गोकुळधाम सोसायटीत राहत होता. त्याने राहत्या घरात त्याच्या रूममध्ये अचानकपणे गुरुवारी सायंकाळी चिठ्ठी लिहून गळफास घेत जीवन संपवले.
वरूणला बेशुद्धावस्थेत त्याचा मावसभाऊ तेजस पवार याने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून वरुणला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी, दोन बहिणी, काका असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने ध्रुवनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी वरुणने मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.
Comments are closed.