
- जॉगिंग ट्रॅकलगत झाडाला गळफास घेत संपवली जीवनयात्रा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शहराच्या इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीजवळ शुक्रवारी रात्री ‘पीजी’ म्हणून वास्तव्यास वीस वर्षीय वैष्णवी आवारे हिची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी साहिल अशोक लाव्हारे हा घटना घडल्यानंतर फरार झाला होता. तथापि, घटना घडल्यानंतर काही तासांतच आरोपीनेदेखील आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वैष्णवी आणि साहिल दोघेही अमळनेर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
प्रेमप्रकरणातून आधी खून आणि पाठोपाठ आत्महत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास संशयित साहिल याने वैष्णवी आवारे हिची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात केली होती. वनसंपदा सोसायटीतील गार्डनमध्ये ही घटना घडली. त्यानंतर शहरभर खळबळ माजली. पोलिसांनी संशयिताचा शोध सुरु केल्यानंतर मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या दरम्यान इंदिरानगर परिसरातील अशोका हॉस्पिटलसमोरील जॉगिंग ट्रॅकलगत एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत साहिल अशोक लाव्हारे याचा मृतदेह आढळून आला. खून करून पसार झालेल्या संशयिताचा काही तासांतच मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
विवाह इतरत्र ठरल्याने काटा काढला ?
दरम्यान, या प्रकरणाला प्रेमसंबंधांची किनार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वैष्णवी आणि संशयित साहिल यांचे पूर्वी प्रेमसंबध होते. ते दोघे ‘लिव्ह इन’ मध्ये राहत होते. तथापि, दोघांमध्ये काहीतरी बिनसले आणि वैष्णवी साहिलपासून वेगळी राहू लागली. त्यानंतर एका मैत्रिणीच्या माध्यमातून वैष्णवीचा विवाह एका तरुणासोबत निश्चित झाला. ही बाब साहिल याला कळल्यानंतर त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. घटनेच्या दोन दिवस आधी वैष्णवीच्या मानलेल्या भावाने तिच्या जीवाला धोका असल्याचा अर्ज इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिल्याची माहिती आहे. त्यानंतर शुक्रवारी वैष्णवीचा मृत्यू झाला.
Comments are closed.