
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मागील बारा वर्षांतील कारभार २०२९ मधील सत्ताबदलाचे कारण ठरेल, अशी भविष्यवाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केला. प्रस्तावित सत्ताबदलाला राजकीय विरोधक किंवा राजकीय पक्ष कारणीभूत ठरणार नाही, असा दावा देखील त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
नाशिकमध्ये आलेल्या चव्हाण यांनी विविध विषयांवर मतप्रदर्शन केले. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारची झोप उडाली असून एका मंत्र्याचा राजीनामा ही तर सुरुवात आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी फार काळ राहणार नसल्याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाली आहे. त्यामुळे केंद्रात नेतृत्वबदलाच्या हालचाली सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपपंतप्रधान होण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा त्यांनी केला.
पूर्णवेळ शिक्षणमंत्री हवा
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खाते देण्यात आले. तथापि. जोशी यांच्याकडे आधीच तीन महत्त्वाची खाती असताना शिक्षण खात्याचा अतिरिक्त भार देणे चुकीचे आहे. शिक्षण हे ‘पार्ट-टाइम’ खाते नसून, परीक्षांमधील गोंधळ सोडविण्यासह विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेणारा पूर्णवेळ शिक्षणमंत्री देशाला हवा, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील पेपरफुटीच्या घटना लक्षात घेता देवेंद्र फडणवीस हे शिक्षण खात्यासाठी योग्य नसल्याची टिपण्णी त्यांनी केली.
.. ‘ते’ नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखे वागतात
गिरीश महाजन नुकतेच नवीन पालकमंत्री नेमले गेलेत, मात्र ते नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखे वागतात. समृद्धी महामार्ग झाला. पण तिथे बाकीच्या गोष्टी पूर्ण झालेल्या नाहीत. हा महामार्ग कॉन्ट्रॅक्टरसाठी होता का? लोकांच्या सुविधेसाठी होता का? काल येताना पाहिलं काही सुखसोयी केलेल्या नाहीत, थांबे केलेले नाहीत. शक्तीपीठ महामार्ग काढला, एक लाख कोटीचा बजेट आहे, ते दीडलाख कोटीपर्यंत जाईल. कुंभमेळ्याचं 35 हजार कोटी बजेट शॉकिंग असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पत्रकार परिषदेला शरद आहेर, निलेश खैरे, ज्ञानेश्वर गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed.