
- चाकू-गजाचा धाक दाखवत ५१ हजारांचा ऐवज लंपास
** एनजीएन न्यूज नेटवर्क
विंचूर : मच्छिंद्र साळुंके
नाशिक–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील दहेगाव, भरवस फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास तिघा अनोळखी व्यक्तींनी चाकू आणि लोखंडी गजाचा धाक दाखवत पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांसह त्यांच्या सहकाऱ्याची लूट केल्याची धक्कादायक घटना सोमवार, दि. १७ रोजी पहाटे पाचच्या सुमारास घडली.
पेट्रोल पंप ऑपरेटर जनार्धन शिवाजी गांगुर्डे आणि त्यांचे सहकारी संजय भालेराव यांना तिघा अनोळखी आरोपींनी चाकू आणि लोखंडी गजाचा धाक दाखवत धमकावले. त्यानंतर आरोपींनी ५०० रुपयांच्या ८० नोटा, २०० रुपयांच्या २० नोटा, १०० रुपयांच्या ३० नोटा आणि दोन मोबाईल, असा सुमारे ५१ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला.
लुटीनंतर आरोपींनी गोंदेगाव येथील रमजु भयालाल पठाण गांगुर्डे यांच्या मालकीची काळ्या रंगाची यामाहा एफझेड मोटारसायकल क्रमांक एमएच १५ जीक्यू ६९०९ देखील चोरून नेली. या दुचाकीची किंमत सुमारे २० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी जनार्धन शिवाजी गांगुर्डे यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा रजि. नं. २५५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०९(४), ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहाटे महामार्गालगत घडलेल्या या धाडसी लुटीमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तिघे आरोपी अद्याप फरार असून, या लुटारूंच्या मुसक्या लासलगाव पोलिस कधी आवळणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते करीत आहेत.
Comments are closed.