- महिला सक्षमीकरण आणि वंचित घटकांच्या उत्थानासाठीच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव
** एनजीएन न्यूज नेटवर्क
भुवनेश्वर : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा महिला सक्षमीकरण, सामाजिक परिवर्तन आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या सौ. विजयाताई रहाटकर यांना ओडिशातील प्रतिष्ठित कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (KISS) विद्यापीठाच्या वतीने मानद डी.लिट. (Doctor of Letters Honoris Causa) पदवी प्रदान करून गौरविण्यात येत आहे. त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक, सार्वजनिक आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे. हा महाराष्ट्रासाठीही अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
नेदरलँड्समधील हेग येथे स्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष महामहिम न्यायमूर्ती युजी इवासावा तसेच अन्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांच्या उपस्थितीत हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत मिळणारा हा गौरव विजयाताईंच्या कार्याची व्यापक दखल घेणारा आहे.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच राजस्थानातील बीकानेर येथील महाराजा गंगा सिंह विद्यापीठानेही विजयाताई रहाटकर यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले होते. त्यानंतर आता कलिंगसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठाकडून मिळणारी दुसरी मानद डॉक्टरेट पदवी त्यांच्या कार्यकर्तृत्वावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटलेली मान्यतेची मोहोर आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना महिलांचे अधिकार, सन्मान, सुरक्षितता, न्याय आणि समान संधी यांसाठी त्यांनी विविध स्तरांवर पुढाकार घेतला आहे. महिलांच्या प्रश्नांकडे केवळ तक्रारींच्या दृष्टिकोनातून न पाहता त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाच्या व्यापक भूमिकेतून त्या कार्यरत आहेत. महिलांसाठी कायदेविषयक जागरूकता, सामाजिक प्रबोधन, त्यांच्या अधिकारांचे संरक्षण आणि समाजातील वंचित महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे, या कार्यक्षेत्रांना त्यांनी विशेष महत्त्व दिले आहे.
महिला सक्षमीकरण ही केवळ शासकीय योजना किंवा धोरणांची बाब नसून ती समाजाच्या मानसिकतेत आणि सामाजिक व्यवहारात घडणारी परिवर्तनाची प्रक्रिया आहे, या विचारातून त्यांचे कार्य पुढे जात आहे. महिलांना आत्मविश्वास, स्वावलंबन आणि निर्णयप्रक्रियेत समान सहभाग मिळावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
या सन्मानाबद्दल विजयाताई रहाटकर यांनी KISS विद्यापीठाचे संस्थापक प्रा. डॉ. अच्युत सामंत, कुलपती श्री. अशोक कुमार परीजा आणि कुलगुरू प्रा. सरनजीत सिंह यांच्याप्रति मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे. ओडिशा राज्याशी आपले नाते सदैव विशेष आणि आत्मीयतेचे राहिले असून, या सन्मानामुळे ते अधिक दृढ झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
हा सन्मान केवळ वैयक्तिक यश नसून महिला सक्षमीकरण आणि समाजातील वंचित, उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी अधिक व्यापक स्वरूपात कार्य करण्याची प्रेरणा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
सामाजिक बांधिलकी, महिला सक्षमीकरण आणि सार्वजनिक जीवनातील योगदान यांचा गौरव करणारा हा सन्मान विजयाताई रहाटकर यांच्या कार्यप्रवासातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. त्यांच्या या यशामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments are closed.