NGN News
Latest Marathi News

आशिष नहार : नाशिकच्या औद्योगिक विकासाचे बहुआयामी नेतृत्व !( वाढदिवस विशेष )

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिकच्या औद्योगिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करतानाच संघटनात्मक नेतृत्वाच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी योगदान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. आशिष अशोक नहार...

उद्योजकता, सामाजिक बांधिलकी, संघटन कौशल्य, लोकसंपर्क आणि विकासाभिमुख दृष्टिकोन या गुणांचा समन्वय साधत आशिष नहार यांनी आपला प्रवास घडविला आहे. वैयक्तिक व्यावसायिक प्रगतीबरोबरच उद्योगजगताच्या सामूहिक विकासासाठी काम करण्याची भूमिका त्यांनी सातत्याने जपली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय, औद्योगिक आणि सामाजिक प्रवासाचा घेतलेला हा विशेष आढावा.

निमा अध्यक्षपदाची जबाबदारी : औद्योगिक विकासासाठी नवी दिशा

आशिष नहार यांच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (NIMA) या नाशिकच्या प्रतिष्ठित औद्योगिक संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी.

फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांनी निमा अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर औद्योगिक विकासाचा व्यापक दृष्टिकोन ठेवून त्यांनी संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रमांना चालना दिली. ३० डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांची २०२६-२७ या कार्यकाळासाठी बिनविरोध फेरनिवड झाली. ही जबाबदारी त्यांनी सांघिक नेतृत्वाच्या माध्यमातून पुढे नेली.

निमा ही केवळ उद्योजकांची संघटना नसून नाशिक जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम आणि लघुउद्योगांना एकत्र आणणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या संघटनेच्या माध्यमातून उद्योजकांचे प्रश्न शासनदरबारी मांडणे, औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करणे, गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक उद्योगांना नव्या संधी उपलब्ध करून देणे, या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला आहे.

नाशिकला देशातील प्रमुख औद्योगिक गुंतवणूक केंद्र बनविण्याचा संकल्प

नाशिकची औद्योगिक क्षमता मोठी असूनही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, आधुनिक पायाभूत सुविधा, जागतिक बाजारपेठेशी जोडणी आणि तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या बाबतीत अजून मोठी संधी उपलब्ध आहे. ही क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी आशिष नहार यांनी निमा अध्यक्ष म्हणून पाच महत्त्वाच्या विकासविषयक उद्दिष्टांचा रोडमॅप पुढे आणला.

१. नाशिकमध्ये मोठे आणि मेगा औद्योगिक प्रकल्प आणणे.

२. केंद्रीय विद्युत संशोधन संस्था (CPRI) प्रयोगशाळेचा विकास आणि कार्यक्षमता वाढविणे.

३. नाशिकमध्ये कायमस्वरूपी औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणे.

४. निफाड येथील प्रस्तावित ड्राय पोर्ट प्रकल्पाला गती देणे.

५. नाशिकमध्ये संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योगांचे हब तसेच केमिकल व प्लेटिंग उद्योगांसाठी सीईटीपी विकसित करणे.

या पाच उद्दिष्टांच्या माध्यमातून नाशिकला केवळ उत्पादन केंद्र न ठेवता संशोधन, तंत्रज्ञान, निर्यात, संरक्षण उत्पादन आणि आधुनिक उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याची दिशा त्यांनी मांडली आहे.

गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीसाठी सक्रिय पाठपुरावा

नाशिकमध्ये नवीन उद्योग यावेत, विद्यमान उद्योगांचा विस्तार व्हावा आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा त्यांच्या औद्योगिक कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे.

कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६ यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुमारे ₹१४,००० कोटींच्या सामंजस्य करारांच्या प्रक्रियेला चालना मिळाली. याशिवाय महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणूकविषयक उपक्रमांमध्ये नाशिक जिल्ह्यातील मोठ्या प्रस्तावित प्रकल्पांचा समावेश व्हावा, यासाठी निमाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला.

सेमीकंडक्टर, संरक्षण, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, डेटा सेंटर, रिसायकलिंग अशा आधुनिक आणि भविष्यातील उद्योगक्षेत्रांमध्ये नाशिकला संधी मिळावी, यासाठी त्यांनी विविध उद्योजक, गुंतवणूकदार, शासकीय अधिकारी आणि औद्योगिक संस्थांशी समन्वय साधण्यावर भर दिला आहे.

नाशिकच्या उद्योगांना केवळ स्थानिक बाजारपेठेपुरते मर्यादित न ठेवता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या वतीने इन्वेस्ट महाराष्ट्र या उपक्रमात ५४००० कोटींची गुंतवणूक नाशिकला करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

CPRI प्रयोगशाळा : नाशिकच्या इलेक्ट्रिकल उद्योगांसाठी महत्त्वाचे पाऊल

नाशिकमध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांचा विस्तार होत असताना स्थानिक पातळीवर अत्याधुनिक परीक्षण आणि प्रमाणन सुविधा उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या पार्श्वभूमीवर CPRI प्रयोगशाळेच्या विकासासाठी निमा सातत्याने समन्वय आणि पाठपुरावा करीत आहे. CPRI ला NABL मान्यता मिळणे हा या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

या सुविधेच्या पुढील विकासासाठी CPRI अधिकाऱ्यांशी बैठका, तांत्रिक चर्चासत्रे आणि संबंधित संस्थांशी समन्वय साधण्याचे काम आशिष नहार यांच्या नेतृत्वाखाली पुढे नेले जात आहे.

संरक्षण क्षेत्र आणि HAL सोबत नाशिकच्या उद्योगांना जोडण्याचा प्रयत्न

भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरतेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या संधीचा लाभ नाशिकमधील उद्योगांना मिळावा, या उद्देशाने HAL आणि संरक्षण क्षेत्रातील संबंधित संस्थांशी संवाद वाढविण्यावर भर दिला जात आहे.

HAL च्या Aircraft Components Indigenisation विषयक Vendor Meet मध्ये NIMA यांच्या सहभागातून नाशिकच्या उद्योगांची क्षमता आणि उत्पादन कौशल्य सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यापुढे नाशिकमधील उद्योगांसाठी HAL येथे स्वतंत्र Vendor Development Meet आयोजित व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

उद्योगांसाठी पायाभूत सुविधा आणि प्रलंबित प्रश्नांवर पाठपुरावा

औद्योगिक विकासासाठी गुंतवणुकीबरोबरच मूलभूत पायाभूत सुविधांची उपलब्धता आवश्यक असते. रस्ते, वीजपुरवठा, पाणी, सांडपाणी प्रक्रिया, वाहतूक व्यवस्था आणि औद्योगिक सुरक्षेचे प्रश्न सोडविण्यासाठी निमा विविध शासकीय विभागांशी सातत्याने समन्वय साधत आहे.

सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरुस्तीचा पाठपुरावा, औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीचे प्रश्न, CETP प्रकल्प, ४०० केव्ही वीजपुरवठा व्यवस्था, सिन्नर औद्योगिक क्षेत्रातील वीज समस्यांवर उपाययोजना आणि चूंचाळे MIDC मधील वीज उपकेंद्राच्या मागणीसारख्या विषयांवर संघटनेने सक्रिय भूमिका घेतली आहे. त्यामुळे २० वर्षानंतर CETP प्रकल्प मंजूर झाला व कार्यरत होत आहे तसेच लवकरच फ़ूड टेस्टिंग लैब सुद्धा सुरू होणार आहे.

या प्रश्नांवर संबंधित प्रशासन, MIDC, MSEDCL, MPCB आणि पोलीस विभागाशी संवाद साधून उद्योगांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

रोजगारनिर्मिती आणि कौशल्यविकास : तरुणांसाठी संधींचे व्यासपीठ

औद्योगिक विकासाचा खरा फायदा स्थानिक तरुणांना रोजगार मिळाल्यावरच समाजापर्यंत पोहोचतो, ही भूमिका आशिष नहार यांच्या कार्यात दिसून येते.

निमाच्या माध्यमातून आयोजित रोजगार मेळावा, रोजगार महाकुंभ आणि विविध उद्योगांशी समन्वय साधणारे उपक्रम हे त्याचे उदाहरण आहे. रोजगार मेळाव्यात १,००० हून अधिक रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ३०० हून अधिक उमेदवारांना रोजगाराच्या संधी मिळाल्या.

त्याचबरोबर MSME उद्योगांच्या वाढीसाठी कौशल्यविकास कार्यक्रम, तांत्रिक प्रशिक्षण आणि उद्योजकता विकास उपक्रम राबविण्यात आले.

उद्योजकांसाठी नवीन तंत्रज्ञान, व्यवसाय विस्तार, आर्थिक व्यवस्थापन, बाजारपेठेतील संधी आणि उद्योगांच्या स्पर्धात्मक क्षमतेत वाढ यांसाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे.

उद्योगसुरक्षा आणि उद्योजकांच्या हिताचे संरक्षण

औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांची सुरक्षा, चोरीच्या घटना रोखणे आणि कामगार व उद्योजकांच्या हिताचे संरक्षण या विषयांनाही त्यांनी प्राधान्य दिले आहे.

औद्योगिक सुरक्षा, कामगारांचे संरक्षण आणि सुरक्षित उत्पादन व्यवस्था यांसाठी संबंधित शासकीय विभागांच्या सहकार्याने जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमही राबविण्यात येत आहेत.

NIMA INDEX, NIMA POWER, NIMA DIRECTORY आणि NIMA APP: नाशिकच्या औद्योगिक सामर्थ्याचे प्रदर्शन

नाशिकमधील उद्योगांना एकत्र आणणे, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, नवीन ग्राहक आणि पुरवठादारांशी संपर्क वाढविणे आणि आधुनिक औद्योगिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, या उद्देशाने औद्योगिक प्रदर्शनांना विशेष महत्त्व आहे.
तसेच या माध्यमातून नाशिकच्या औद्योगिक क्षमतेला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आता होऊ घातलेल्या NIMA POWER या प्रदर्शनाच्या माध्यमातून ‘Invest to Evolve’ हा संदेश देत उद्योगांना गुंतवणूक, नवतंत्रज्ञान, आधुनिकीकरण आणि व्यवसाय विस्तारासाठी प्रोत्साहित करण्याची ही संकल्पना आहे.

संघभावना आणि सर्वसमावेशक नेतृत्व

आशिष नहार यांच्या कार्यपद्धतीतील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे विविध औद्योगिक संघटना, उद्योजक, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न.

NIMA, AIMA, MACCIA, MASMA, NICE, Laghu Udyog Bharati आणि इतर औद्योगिक संघटनांच्या समन्वयातून सामूहिक प्रश्न मांडण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

MERC च्या प्रस्तावित नियमांबाबत उद्योग संघटनांकडून सूचना व हरकती एकत्रित करून मांडणे असो किंवा औद्योगिक धोरणांबाबत शासनाशी संवाद साधणे असो, उद्योगजगताचा सामूहिक आवाज सक्षम करण्याचा प्रयत्न या कार्यातून दिसून येतो.

त्यांच्या नेतृत्वाखाली निमा केवळ कार्यक्रम आयोजित करणारी संस्था न राहता उद्योगांच्या प्रश्नांवर पाठपुरावा करणारे, नवीन संधी निर्माण करणारे आणि नाशिकच्या औद्योगिक विकासाचा अजेंडा पुढे नेणारे सक्रिय व्यासपीठ बनावे, हा दृष्टिकोन आहे. याचेच परिणाम म्हणून भारतीय प्लानिंग कमिशनने नवीन धोरण तयार करताना निमाच्या सूचनांवर चर्चा करण्यासाठी निमा पदाधिकाऱ्यांना बैठकीस आमंत्रित केले होते.

विकसित नाशिकचे स्वप्न आणि भविष्यातील वाटचाल

नाशिकला धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीबरोबरच औद्योगिक, व्यावसायिक, तांत्रिक आणि रोजगारनिर्मितीच्या क्षेत्रातही राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान मिळावे, हे आशिष नहार यांचे विकासविषयक स्वप्न आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ही नाशिकसाठी पायाभूत सुविधा, पर्यटन, उद्योग, सेवा क्षेत्र आणि गुंतवणूक वाढविण्याची मोठी संधी आहे. या संधीचा उपयोग करून नाशिकची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक व्यापक करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे.

नाशिक हे पुणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या औद्योगिक केंद्रांच्या तुलनेत गुंतवणुकीसाठी स्पर्धात्मक ठरावे, स्थानिक उद्योजकांना जागतिक बाजारपेठ मिळावी, तरुणांना त्यांच्या शहरातच रोजगार उपलब्ध व्हावा आणि लघु-मध्यम उद्योग मोठ्या उद्योगांच्या पुरवठा साखळीचा भाग बनावेत, ही त्यांच्या पुढील वाटचालीची दिशा आहे.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

राजकीय प्रवास : भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून संघटनात्मक कार्य

भारतीय जनता पक्षाशी जोडलेला आशिष नहार यांचा राजकीय प्रवास हा संघटनात्मक कार्य, कार्यकर्त्यांशी संवाद आणि जनसंपर्क यांच्याशी संबंधित आहे. पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवत संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या माध्यमातून त्यांनी राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नाशिक शहर संघटनेत उद्योग आघाडी अध्यक्ष, शहर उपाध्यक्ष तसेच खजिनदार म्हणून त्यांच्यावर तिसऱ्यांदा जबाबदारी सोपविण्यात आली. या पदाच्या माध्यमातून पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात आर्थिक नियोजन, शिस्त आणि व्यवस्थापन यांसारख्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे.

राजकीय क्षेत्रातील त्यांचा दृष्टिकोन हा केवळ पदापुरता मर्यादित नसून समाजातील विविध घटकांशी संवाद साधणे, उद्योजकांचे प्रश्न संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचविणे आणि विकासाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे असा राहिला आहे.

राजकीय क्षेत्रातील संघटनात्मक जबाबदारी, निमा अध्यक्ष म्हणून औद्योगिक क्षेत्रासाठी केलेले कार्य, उद्योजकांच्या प्रश्नांसाठी घेतलेला पुढाकार आणि नाशिकच्या विकासासाठी आखलेली व्यापक दृष्टी या सर्वांचा संगम म्हणजे आशिष नहार यांचा आजवरचा प्रवास.

कोणत्याही शहराचा विकास हा एका व्यक्तीच्या प्रयत्नांतून होत नसतो; त्यासाठी उद्योजक, कामगार, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि समाजातील सर्व घटकांची एकजूट आवश्यक असते. या सर्व घटकांना एकत्र आणून विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न आशिष नहार यांच्या कार्यातून दिसून येतो आणि त्यांच्या नेतृत्वातून नाशिकच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळो, हीच सदिच्छा !

राजेंद्र अहिरे
सचिव, निमा.

Comments are closed.