NGN News
Latest Marathi News

नवरात्रोत्सवानिमित्त ‘रुद्रा नारीशक्ती गौरव पुरस्कार’ आयोजन

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून समाजासाठी प्रेरणादायी योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी ‘रुद्रा नारीशक्ती गौरव पुरस्कार २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. रुद्रा कुलकर्णी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिकतर्फे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

शिक्षण, वैद्यकीय सेवा, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, कायदा, उद्योग व व्यवसाय, सामाजिक कार्य, कला व संस्कृती, क्रीडा, प्रशासन व सुरक्षा, पत्रकारिता व माध्यमे, कृषी, गृहिणी व कुटुंब व्यवस्थापन, आर्थिक व वित्तीय क्षेत्र, पर्यावरण व जनजागृती तसेच अन्य विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांना पुरस्कारासाठी नामांकन करता येणार आहे.

आपल्या परिसरातील, कुटुंबातील किंवा कार्यक्षेत्रातील कर्तृत्ववान व प्रेरणादायी महिलांचे नामांकन करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. इच्छुकांनी स्वतःचे किंवा अन्य कर्तृत्ववान महिलेचे नामांकन करता येईल. नामांकनासाठी महिलेचे संपूर्ण नाव, व्यवसाय अथवा कार्यक्षेत्र, मोबाईल क्रमांक, केलेल्या उल्लेखनीय कार्याची थोडक्यात माहिती तसेच उपलब्ध असल्यास कार्याचे पुरावे किंवा प्रमाणपत्रे सादर करावीत.
‘कर्तृत्वाचा सन्मान, नारीशक्तीचा गौरव’ या संकल्पनेतून आयोजित या पुरस्कारासाठी अधिकाधिक महिलांनी नामांकन करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८३२९९१८८२४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Comments are closed.