NGN News
Latest Marathi News

ज्येष्ठ कवयित्री सुशीलाताई संकलेचा यांना ‘नाशिक काव्यगौरव’ पुरस्कार जाहीर

  • ८२व्या वर्षीही कवितेचा झरा अखंड प्रवाही; नाशिक कवीच्या तेविसाव्या वर्धापनदिन सोहळ्यात होणार सन्मान

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : शब्दांशी आयुष्यभर नाते जपताना आपल्या संवेदनशील लेखणीतून भावविश्वाचे नानाविध रंग उलगडणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री सुशीलाताई संकलेचा यांच्या प्रदीर्घ काव्यसाधनेचा गौरव करण्यासाठी त्यांना नाशिक कवी संस्थेचा प्रतिष्ठेचा ‘नाशिक काव्यगौरव’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वयाच्या ८२व्या वर्षीही त्यांची लेखणी तितक्याच उत्साहाने आणि नव्या उमेदीने शब्दफुले फुलवीत आहे, ही त्यांच्या साहित्यनिष्ठेची आणि सर्जनशीलतेची विशेष साक्ष आहे. कवींचे हक्काचे व्यासपीठ म्हणून साहित्यविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या नाशिक कवी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि तीन हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सुशीलाताई संकलेचा या नाशिकच्या साहित्यविश्वातील ज्येष्ठ आणि सन्माननीय कवयित्री असून संस्थेच्या स्थापनेपासूनच त्या नाशिक कवी परिवाराशी जोडलेल्या आहेत. त्यांच्या कवितांमधून जीवनातील विविध भावछटा, नात्यांमधील ओलावा आणि मानवी संवेदनांचे हळुवार दर्शन घडते. महाराष्ट्र शासनाने त्यांचा ‘अवतीभवती’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला असून ‘भावाफुलांची ओंजळ’ हे पुस्तकही वाचकांच्या भेटीला आले आहे. त्यांच्या आणखी एका कवितासंग्रहाचे प्रकाशन लवकरच होणार आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. वाढत्या वयाबरोबर लेखणीची धार आणि अभिव्यक्तीचा उत्साह अधिकच समृद्ध होत असल्याचे त्यांच्या साहित्यप्रवासातून दिसून येते.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास ज्येष्ठ कवी व साहित्यिक इंजि. विलास शेळके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून नाशिक कवीचे अध्यक्ष सुभाष सबनीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. नोव्हेंबर २००३ मध्ये ज्येष्ठ लेखक व कवी शरद पुराणिक यांनी स्थापन केलेल्या नाशिक कवी संस्थेचा तेविसावा वर्धापनदिन आणि पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता भावबंधन मंगल कार्यालय, हनुमानवाडी, पंचवटी येथे आयोजित करण्यात आला आहे.

या साहित्यसोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे प्रारंभी आयोजित करण्यात येणारी कवींची काव्यसादरीकरण स्पर्धा! उपस्थित कवींना आपल्या प्रतिभेचे आणि काव्यकौशल्याचे दर्शन घडविण्याची संधी या माध्यमातून मिळणार असून स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना याच कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.

शब्दांची मैत्री, कवितेची निष्ठा आणि साहित्याचा सन्मान या त्रिसूत्रीवर वाटचाल करणाऱ्या नाशिक कवीच्या या वर्धापनदिन सोहळ्याला संस्थेचे सर्व सदस्य, कवी, साहित्यिक आणि काव्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब गिरी, कार्यवाह नंदकिशोर ठोंबरे, कोषाध्यक्ष इंजि. अजिंक्य मगर तसेच स्मिता बनकर, भारती देव, प्रांजली आफळे आणि किरण मेतकर यांनी केले आहे.

Comments are closed.